मोद जठार यांचा इशारा : ७ नंतर भाजप भूमिका ठरवणार
कणकवली, ता.५ : भाजपने आपला युती धर्म पाळलेला आहे. त्याच धर्तीवर शिवसेनेने देखील येथे युती धर्माचे पालन करायला हवे. कणकवली मतदारसंघात शिवसेनेने सतीश सावंत यांना दिलेला एबी फॉर्म मागे घ्यावा अन्यथा शिवसेनेसोबत संघर्ष अटळ असल्याचा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आज येथे दिला. तसेच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी म्हणजे 7 ऑक्टोबरला भाजप आपली भूमिका ठरवेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
येथील भाजप कार्यालयात जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी पत्रकार परिषद घेऊन युती बाबतची आपली भूमिका मांडली. यावेळी रवींद्र शेट्ये, अरविंद कुडतरकर, सुहास सावंत आदी उपस्थित होते.
श्री जठार म्हणाले नारायण राणे आता भाजपमध्ये आलेले आहेत. तर नितेश राणे हे कमळ चिन्हावर निवडणूक लढवीत आहेत. लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे विनायक राऊत यांच्या विरोधात स्वाभिमान पक्षाने उमेदवार उभा केला होता. भाजपने केलेला नाही. राणे आता भाजपात आहेत त्यामुळे ते आमचे नेते आहेत. त्यांच्या विरोधात शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करून त्यांनी थेट भाजपला आव्हान दिले आहे. त्यामुळे शिवसेनेने सतीश सावंत यांना दिलेला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा आणि येथे धर्माचे पालन करावे. शिवसेनेने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यास त्यांच्याशी संघर्ष अटळ आहे. आम्ही युद्धाची घोषणा आधीच केलेली आहे. ७ तारीख नंतर त्याबाबत अधिकृत भूमिका जाहीर करू असेही जठार म्हणाले.