सतीश सावंतांनी अर्ज मागे न घेतल्यास आम्ही सुध्दा बंडखोरी करू

2

महेश सारंग: युतीचा धर्म केसरकरांनी पहिला तोडला..

सावंतवाडी ता.०५:

बंडाची सुरुवात पहिल्यांदा पालकमंत्री दीपक केसरकरांनी सुरू केली आहे.कणकवली मतदारसंघात भाजपाने जर राणेंना उमेदवारी दिली,तर आम्ही शिवसेनेचा उमेदवार उभा करू असा दावा मंत्र्यांनी केला होता.त्यामुळे युतीचा धर्म पहिल्यांदा केसरकरांनी तोडला,म्हणून आम्हाला सावंतवाडी मतदारसंघात बंडखोरी करावी लागत आहे,जर शिवसेनेतून सतीश सावंत यांचा अर्ज ७ तारीखच्या आत मागे नाही घेतला,तर आम्ही हा बंड कायम ठेवणार आहोत.असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष महेश सारंग यांनी आज येथे दिला.तेलींनी युतीचा धर्म तोडला अशी टीका श्री.केसरकर यांनी केली होती.त्याला श्री.सारंग यांनी प्रत्युत्तर दिले.

श्री सारंग येथील भाजपा कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निशांत तोरसकर,महेश धुरी आदी उपस्थित होते.
श्री.सारंग पुढे म्हणाले,आमची बंडखोरी मागे घेण्यासंदर्भात जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल,मात्र कणकवली मतदार संघात सावंत यांची उमेदवारी शिवसेनेने रद्द न केल्यास सावंतवाडी मतदार संघातील तेलींची उमेदवारी सुद्धा आम्ही रद्द होऊ देणार नाही.त्यांना निवडून देण्यासाठी आम्ही मोर्चेबांधणी सुद्धा सुरू केली आहे.आणि तळागाळातील आमचे कार्यकर्ते सुद्धा तेलींना निवडून आणण्यासाठी सहकार्य करतील,असा विश्वासही त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले उद्यापासून १२ तारीख पर्यंत आम्ही परिवर्तन यात्रेला सुरुवात करणार आहोत.या यात्रेच्या माध्यमातून आम्ही तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहचून नेमका विकास म्हणजे काय?,आणि विकासाच्या नावाखाली पालकमंत्र्यांनी जनतेची कशी फसवणूक केली आहे ? हे सर्वसामान्यांना पटवून देणार आहोत. या यात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे,असे आवाहनही यावेळी बोलताना श्री.सारंग पत्रकारांच्या माध्यमातून केले आहे.

0

4