तरुण पिढीने प्रशासकीय सेवेत प्रतिनिधित्व करायला हवे…

2

 

विश्वनाथ कदम ; कट्टा येथे ६३ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा…

मालवण, ता. ८ : आज सर्व क्षेत्रात नवी पिढी तालुक्याला पुढे घेऊन जात आहे. यात मालवण तालुका रोल मॉडेल ठरावा यासाठी अहोरात्र मेहनत घ्यावी लागेल. सर्वार्थाने श्रीमंत पिढी घडवूया. तरुण पिढीने प्रशासकीय सेवांमध्ये प्रतिनिधित्व करायला हवे असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम यांनी कट्टा येथे केले.
भारतीय बौद्ध महासभा शाखा मालवण तालुका यांच्यावतीने कट्टा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ६३ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष सिद्धार्थ जाधव यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना दीपप्रज्वलन व पुष्पहार घालून उदघाटन करण्यात आले. यावेळी पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, डॉ. प्रियांका गेडाम, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, जिल्हाध्यक्ष विश्वनाथ कदम, प्रबोधनकार दयानंद मेथर, व्ही. टी. जंगम, सूर्यकांत कदम, दर्शना गुळवे, रविकांत कदम, संजय पेंडूरकर, गौतम पळसंबकर, आनंद धामापूरकर, शशी गोठणकर, नरेंद्र पेंडूरकर, शिवप्रसाद चौकेकर, संदीप धामापूरकर, नंदू हेदुळकर, यांच्यासह धम्मबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डॉ. अनुप पळसंबकर व डॉ. अक्षय पळसंबकर, डॉ. दिलीप कदम, डॉ. जागृती कदम, प्राध्यापक नंदू हेदुळकर, वैभव वळंजू, निखिल वराडकर, आयुष वराडकर, संदेश डिकवलकर, यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
पोलिस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम म्हणाले, मी शहरातील आहे. पण ग्रामीण भागात धम्मबांधव तळागाळात करताहेत. समाजासाठी माझे सहकार्य असेल. ध्येय निश्चित करायला हवे. शिका संघटित व्हा संघर्ष करा हा मूलमंत्र घेऊन काम करा. शिकल्यावर नोकऱ्याची ऑफर येते. समाजाची सर्वांनी जबाबदारी घ्यायला हवी. आज संघर्ष केला तर आयुष्यात यशस्वी व्हाल. नागपुरातून चळवळ सुरू झाली. माझ्यावर त्याचा प्रभाव आहे. बाबासाहेबांनी दिलेला धम्म आत्मसात करायला पाहिजे. त्रिसरण पंचशीलांचे अनुकरण केले गेले पाहिजे. बाबासाहेबांसारखा कोणी होऊ शकत नाही. आपल्यात खूप क्षमता आहे. त्याचा योग्य वापर करायला हवा. या चळवळीत खंड पडता नये.
सामाजिक प्रबोधनकार दयानंद मेथर म्हणाले, शब्द शस्त्रे बनली पाहिजे. जेव्हा बाराखडी, शाळा नव्हती तेव्हा बुद्धानी पाच विश्वविद्यालये दिली. शिक्षण दोन पध्दतीचे असते. प्राथमिक शिक्षण, सामाजिक शिक्षण. शिक्षण झालेला माणूस जागृत होणे आवश्यक असते. सामाजिक शिक्षण विहारातून घडते. बाबासाहेबांनी शुद्ध विचार दिला. समाज नव्याने उभा राहिला पाहिजे. सामाजिक प्रामाणिकपणातून महामानव घडतात. महामानवाची विचारधारा समाजापर्यंत पोचण्यासाठी समाज प्रबोधनासाठी वेळ दिलाच पाहिजे. बाबासाहेब समजले तर संपूर्ण कुटुंब समाजात येते. समाजात असतो त्याचाच विकास होतो. डोक्यावर विचारधारेची घागर घेऊन चळवळीला पाणी घातले पाहिजे. कौडिण्य पवार म्हणाले, बौद्ध धर्म माझा आहे, तो टिकवणे माझ्या हातात आहे. आपल्या धम्माचा अभिमान वाटला पाहिजे.
प्रास्ताविक प्रकाश पवार यांनी केले. आभार पळसंबकर यांनी मानले.

10

4