निलेश राणे; मी रागीट नाही, पण लोकांची कामे होण्यासाठी कधी तरी त्याच भाषेत बोलावे लागते..
सावंतवाडी,ता.१६: राणे आणि संघर्ष काही नवीन नाही. मागच्या काही वर्षात अनेक संघर्ष करावा लागला. मात्र केवळ संजू परबांसारखे प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारे मित्र सोबत राहिले त्यामुळे मी राजकीय जीवनात यशस्वी झालो. आता दीपक केसरकरांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढील राजकीय वाटचाल करीत आहे. ते दोन वेळा माझ्या पाठिशी राहिले. त्यामुळे दोन्ही वेळा माझा विजय झाला. आता पुढील वाटचाल माझी सर्वसामान्यांसाठी असेल, असे मत शिवसेनेचे युवा नेते तथा आमदार निलेश राणे यांनी आज येथे केले. दरम्यान मी रागीट स्वभावाचा आहे, असे लोकांना वाटत पण माझ्यासारखा सोज्वळ माणूस नाही. मात्र सर्वसामान्यांचे रेंगाळलेले काम मार्गी लागण्यासाठी काही वेळा भाषा बदलावी लागते तरच त्यांची कामे होवू शकतात. त्यामुळे माझी तळमळ असते ती अनेकांनी सभागृहात काम करताना पाहिली असेल, असे ते म्हणाले.
संजू परब मित्रमंडळ आणि सह्याद्री फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री. राणे यांचा वाढदिवस आज येथील हॉटेल मँगो मध्ये साजरा करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना श्री. राणे बोलत होते.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, विधानसभा मतदारसंघ प्रमुख प्रेमानंद देसाई, तालुका प्रमुख बबन राणे, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, जावेद खतिब, गुरुनाथ सावंत, मंदार नार्वेकर, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, दिनेश गावडे, भाजप शहरप्रमुख अजय गोंदावळे, सह्याद्री फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ, प्रल्हाद तावडे, सुजित कोरगावकर, प्रसन्ना शिरोडकर, पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी, संतोष गांवस, ज्ञानेश्वर सावंत, क्लेटस फर्नांडीस, संदेश सोनुर्लेकर, माजी नगरसेवक गुरु मठकर, परिक्षीत मांजरेकर, सुधा कवठणकर, दिनेश गावडे, सिताराम गावडे, भाजपच्या शहर महिला आघाडी प्रमुख मोहिनी मडगांवकर, माजी नगरसेविका उत्कर्षा सासोलकर, सुशांत पांगम, झेवियर फर्नाडीस, दीनानाथ नाईक, प्रसन्ना शिरोडकर, प्रल्हाद तावडे, प्रताप परब, समीर पालव, संजय नाईक, प्रतीक बांदेकर, प्रवीण साठे, देव्या सूर्याजी, तात्या वेंगुर्लेकर, बंटी पुरोहित, सत्यवान बांदेकर, समीर पालव यांसह महायुतीचे शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, मी मागील दहा वर्षात खूप काही पाहिले. खूप संघर्ष करावा लागला. वास्तविक पाहता राणे म्हणजेच संघर्ष. मागील काही वर्षात खूप सहन केले. विरोधक आमच्या घरापर्यंत पोहोचले होते. केलेला संघर्ष खूप मोठा होता. अनेक किल्ले ढासळत असताना राणेंचा गड मात्र शाबूत ठेवला हीच खरी ताकद आहे. या संघर्षाच्या काळात संजू परब यांच्यासारखे अनेक खांदे कार्यकर्ते भावाप्रमाणे माझ्या सोबत राहिले. कार्यकर्त्यांचं हेच प्रेम हीच माझ्यासारख्याची खरी ताकद आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान आमदार दीपक केसरकर यांच्याकडून अनेक गोष्टी शिकतोय. त्यांच्या सोबत असल्याने माझ्यात बदल झाला आहे. पण भिती आहे की माझ्या स्वभावाचा त्यांच्यावर परिणाम होऊ नये, अशी मिश्किल टिपणीही त्यांनी केली.
आज कोकणातील विविध प्रश्नांना मी सभागृहात वाचा फोडत आहे. २८८ आमदारांच्या सभागृहात माझ्यासारखा आमदार जे काही शक्य होते ते मांडण्याचा प्रयत्न करतोय. पण ते सोप्प नाहीय. तिथे आपले प्रश्न मांडणं व आपल्याला हवं तस करून घेणं हे सोप नाहीय. त्यासाठी आमचे नेते माजी मुख्यमंत्री नारायण राणे तसेच केसरकरांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. केसरकर यांनी मंत्री म्हणून तसेच सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून या जिल्ह्यासाठी आणलेला हजारो कोटी रुपयांचा निधी हे त्यांचं कार्य निश्चितच वाखाणण्याजोग आहे. त्यांच्या याच कार्याच्या प्रेरणेतून काम करण्यासाठी व जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत. फक्त तुमचं प्रेम व तुमचा पाठिंबा हा महत्त्वाचा आहे.
संजू तुझे व सहकाऱ्यांचे मनापासून आभार. संजू नेहमी नवनवीन पद्धतीने वाढदिवस साजरा करतो. तो माझा भाऊच आहे. त्यामुळे हक्काने बोलतो. तुमचा हे प्रेम नेहमीच असंच माझ्या पाठीशी राहू दे मी तुम्हाला काहीही कमी पडू देणार नाही, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.



