नितेश राणेंची घोषणा; गोड्या पाण्यातील मत्स्य शेती वाढवण्यासाठी प्रयत्न…
कणकवली, ता.२४: मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देण्याचा महायुती सरकारचा प्रयत्न आहे, अशी घोषणा मत्स्य बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी आज विधानसभेत केली. तलावाचा गाळ काढणे आणि तलावांवरील अतिक्रमण हटविणे यालाही प्राधान्य दिले जात आहे, असे राणे म्हणाले. प्रश्नोत्तराच्या तासावर विधान परिषदेत राणे यांनी आमदार परिणय फुके, प्रवीण दरेकर, उमाताई खापरे, भाई जगताप, प्रसाद लाड, एकनाथ खडसे या आमदारांनी विचारलेल्या प्रश्नांवर माहिती दिली.
आमदार फुके यांनी विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य शेती विषयी काही प्रश्न परिषदेत मांडले. यावेळी चौकशी समितीची स्थापना करण्याची मागणी केली. यावरही मंत्री राणे यांनी पूर्व विदर्भातील परिस्थितींचा आढावा घेण्यासाठी चौकशी समिती स्थापन केली, जाईल आणि दोषींवर कारवाई केली जाईल व वस्तुस्थिती जाणून घेतली जाईल, असे सांगितले. बारा कोटींचे उत्पन्न असलेला मत्स्य विभाग गोड्या पाण्यातील मासेमारीतून दोन कोटी एवढेच उत्पन्न येत आहे. त्यामुळे हे उत्पन्न वाढले पाहिजे. गोड्या पाण्यातील मासेमारी करणाऱ्या कुटुंबांनाही त्याचा फायदा झाला पाहिजे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आपण गोड्या पाण्यातील मासेमारी वरील धोरण तयार करत आहोत. विदर्भातील गोड्या पाण्यातील मत्स्य शेती संदर्भात महसूल मंत्री बावनकुळे यांच्या सूचनाही विचारात घेऊन काम सुरू आहे, असे राणे यांनी सांगितले.