राणेंच्या तिसर्‍या पराभवासाठी सज्ज व्हा…

2

खासदार विनायक राऊत यांचे शिवसैनिकांना आवाहन….

कणकवली, ता.०९ :

नारायण राणे यांचा पहिला पराभव वैभव नाईक यांनी कुडाळ मतदारसंघातून केला. त्यानंतर लोकसभेत नीलेश राणे यांचे आव्हान आम्ही दोन वेळा संपुष्टात आणले. आता कणकवलीतील आमदार नीतेश राणे यांची सद्दी संपविण्यासाठी सतीश सावंत लढत आहेत. त्यांना पाठबळ द्ेऊन राणेंच्या तिसर्‍या पराभवासाठी सज्ज व्हाव असे आवाहन खासदार विनायक राऊत यांनी केले. ते कणकवली येथील शिवसेना प्रचार शुभारंभाच्या मेळाव्यात बोलत होते.
शिवसेना मेळाव्याला आमदार वैभव नाईक, शिवसेना उमेदवार सतीश सावंत, अतुल रावराणे, युवा नेते संदेश पारकर, भाजप तालुकाध्यक्ष संदेश पटेल, बाळा भिसे, महिला जिल्हा संघटक नीलम पालव, प्रथमेश सावंत, राजू शेट्ये, शैलेश भोगले, अ‍ॅड.हर्षद गावडे, सुशांत नाईक, भालचंद्र दळवी आदी उपस्थित होते.
खा.राऊत म्हणाले, आमचा भाजप नेत्यांना किवा भाजप पक्षाला विरोध नाही. तर राणेंच्या प्रवृत्तीला विरोध आहे. विकास हाच आमचा अजेंडा आहे तोच आम्ही मतदारापर्यंत पोचवत आहोत. संदेश पारकर, अतुल रावराणे हे भाजपमध्येच राहावेत, त्यांनी नीतेश राणेंसाठी प्रचार करावा यासाठी या दोहोंना दोन ते तीन कोटींची ऑफर देण्यात आली होती. पण स्वार्थासाठी इमान गहाण टाकणारी ही मंडळी नाहीत.
राऊत म्हणाले, चार महिन्यापूर्वी ज्या नीतेश राणे यांनी मोदींचे नग्न व्यंगचित्र काढून त्यांच्यावर टीका केली होती. त्याच राणेंना भाजपकडून तिकीट मिळते ही बाब दुदैवी आहे. तर चार महिन्यापूर्वी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार राणेंची हकालपट्टी करा अशी मागणी करत होते. तसेच आता राणेंसाठी पायघड्या घालत आहेत. मागील चार महिन्यात असा काय बदल झाला की राणेंसाठी जठार जीव द्यायला तयार झाले हे समजत नाही.
कणकवली विधानसभा मतदारसंघात अप्पा गोगटे यांनी विकास आणि जनसंवादाची आदर्श परंपरा सुरू केली. अ‍ॅड.अजित गोगटे आणि त्यानंतर प्रमोद जठार यांनी ही परंपरा चालू ठेवली. पण गेल्या पाच वर्षात कणकवली मतदारसंघ विकासात मागे राहिला आणि चिखलफेक राडेबाजी सुरू राहिली. ही परंपरा आम्हाला खंडीत करायची आहे. त्यासाठी सतीश सावंत यांना विजयी करणं ही आपला सर्वांची जबाबदारी आहे. कणकवली विधानसभेच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष आहे.

6

4