दसरोत्सवात पंडित, भाईप यांच्यातील वाद उफाळला…

2

बांदा-कास येथील घटना ; १४ जणांविरोधात गुन्हे दाखल…

बांदा, ता. ९ :

देवीची तरंगकाठी व कळस फिरवण्याच्या मानपानावरून कास येथील पंडीत व भाईप यांच्यातील देवस्थानचा असलेला वाद दसरोत्सवात पुन्हा एकदा उफाळून आला आहे. सावंतवाडी तहसीलदारांनी विजयादशमी दिवशी गावात लागू केलेल्या मनाई आदेशाचे उल्लंघन करून पंडीत गटाने दसरोत्सव साजरा केल्याने मडूरा महसुल मंडळ अधिकारी अशोक यशवंत पवार यांनी बांदा पोलीसांत फिर्याद दिली आहे. त्यावरून बांदा पोलीसांत तब्बल १४ जणांविरोधात भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर दरम्यान भाईप व पंडीत गटाने गावात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखून दसरोत्सव साजरा करण्याचे आदेश सावंतवाडी तहसिलदारांनी दिले होते. तसेच तरंगकाठी व कळस फिरविण्यास मनाई आदेश दिला होता. मात्र, पंडीत गटाने मनाई आदेश धुडकावत तरंगकाठी फिरविल्याचा भाईप गटाचा आरोप होता. फिर्यादी नुसार तहसीलदारांच्या आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंडीत गटाच्या तब्बल १४ जणांवर भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांनी दिली आहे. त्यात राजाराम दत्ताराम पंडीत, विश्वनाथ सखाराम पंडीत, कृष्णा महादेव पंडीत, मनोहर हरी पंडीत, घनश्याम राजाराम पंडीत, विठ्ठल जनार्दन पंडीत, विश्वास भास्कर पंडीत, नकुळ रामचंद्र पंडीत, सुरेश माम पंडीत, सुभाष शांताराम पंडीत, बाबली शिवराम पंडीत, विजय रामकृष्ण पंडीत, वसंत गोविंद पंडीत व सत्यवान बलराम पंडीत यांचा समावेश आहे. चार दिवसांत सर्व संशयितांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक जाधव यांनी सांगितले.

15

4