सावंतवाडी, ता. ११: तळवडे येथील मिठबावकर ज्वेलर्स या दुकानात अज्ञात चोरट्याने चोरी केली आहे. यात ६ हजार रुपये किमतीची चांदीची पैंजण व जोडे असे मिळून ७ हजाराचा मुद्देमाल लंपास केला आहे.याबाबतची तक्रार वीरेंद्र झिलू मिठवावकर (वय ४५ रा. वेत्ये) यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, श्री विठबावकर यांचे तळवडे येथे मिठबावकर ज्वेलर्स नावाने दुकान आहे. ते नेहमीप्रमाणे काल आपले दुकान रात्री उशिरा बंद करून गेले होते. आज सकाळी त्या ठिकाणी आले असता त्यांना दुकानाचे शटर हत्याराने तोडलेले दिसले. यावरून त्यांना आपल्या दुकानात चोरी झाल्याचे समजले. याबाबतची माहिती त्यांनी पोलीस ठाण्यात दिली आहे. पंचनामा केला असता ७ हजाराच्या चांदीच्या वस्तू चोरीला गेल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.