विकास न केल्यानेच भावनिक होऊन मते मागण्याची वेळ ; राजन तेली यांची टीका…
बांदा, ता. १० : माझ्यावर आरोप करण्यापेक्षा दीपक केसरकर यांनी उद्योगपती अवधूत तिंबलो यांच्याशी असलेले संबंध प्रथम जाहीर करावे. मी भाड्याच्या घरात राहतो. केसरकर राहत असलेले घर कोणाच्या नावावर आहे ते त्यांनी जाहीर करावे. केसरकर यांनी जाहीर केलेला चष्म्याचा कारखाना राहिला कुठे? असा सवाल करत मतदारसंघातील रस्त्याचा प्रश्न गंभीर असताना पालकमंत्री भूमीपूजनात व्यस्त आहेत. विकासकामे न केल्यानेच केसरकर भावनिक होऊन मतांची याचना करत आहेत. मात्र या निष्क्रिय पालकमंत्र्यांचा पराभव यावेळी अटळ आहे. भाजप व स्वाभिमान एकत्रित असल्याने आपला विजय निश्चित आहे असा विश्वास माजी आमदार राजन तेली यांनी येथे व्यक्त केला.
येथील संतोषी माता मंगल कार्यालयात भाजप व महाराष्ट्र स्वाभिमानाच्या कार्यकर्ता मेळाव्यात तेली बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोव्याचे माजी आमदार सदानंद तानावडे, स्वाभिमानाचे तालुकाध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक प्रमोद कामत, सरपंच अक्रम खान, जिल्हा परिषद सदस्य श्वेता कोरगावकर, गुरुनाथ सावंत, अपेक्षा नाईक, केदार कणबर्गी, जावेद खतीब, अन्वर खान, अशोक सावंत, संदीप बांदेकर, श्यामकांत काणेकर, राजा सावंत, मंदार कल्याणकर, सचिन नाटेकर, बाळा आकेरकर, रमेश सावळ गजानन गायतोंडे, किशोरी बांदेकर, आबा धारगळकर, समाजकल्याण सभापती अंकुश जाधव आदी उपस्थित होते.