विनोद सातार्डेकर यांची संकल्पना ; कार्यक्रमाला विद्यार्थी, पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद…
मालवण, ता. १८ : देश स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षाचा संविधान अमृत महोत्सव साजरा करत असताना, प्राचीन जनपदांच्या ज्ञानापासून ते आधुनिक संविधानाच्या परिवर्तनकारी शक्तीपर्यंतच्या भारताच्या प्रवासावर चिंतन करण्याचा हा एक योग्य क्षण आहे. संविधानाच्या जागर तळागाळापर्यंत झाला पाहिजे आणि म्हणूनच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्रशाळा मसूरे नंबर १ येथे वारकरी पद्धतीने पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक विनोद सातार्डेकर यांनी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संविधानावरील कलमांचा कीर्तनातून मागोवा घेतला.
या कीर्तनासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांची कर्तव्ये, महत्त्वाची कलमे, शिक्षणासाठी संविधानाचे योगदान आदी विविध विषयांना स्पर्श करत व त्यांची मन जिंकली. संविधानातील प्रास्ताविकेचे विश्लेषण करताना व्यवहारातील छोटी छोटी उदाहरण देत हसत खेळत वातावरण फुलवीत प्रेक्षकांमधून वाहवा मिळवली. या उपक्रमाला केंद्रप्रमुख नारायण देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शीतल मसुरकर, उपाध्यक्ष संतोष दुखंडे, शिक्षण तज्ञ संमेश मसुरेकर, रामेश्वरी मगर, सुजाता वेडेकर, शिफा शेख, हेमलता दुखंडे तर या कीर्तनाला संगीत साथ हार्मोनियम गोपाळ गावडे, ढोलकी अमेय मेस्त्री, तबला यश परब, ओमकार गावडे, समर्थ शिंगरे आणि इयत्ता सातवी आठवीतील विद्यार्थ्यांनी कोरस साथ केली.