Saturday, May 24, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यादांडी येथील रस्त्यावरील अडथळा दूर करण्यास प्रशासनाची टाळाटाळ...

दांडी येथील रस्त्यावरील अडथळा दूर करण्यास प्रशासनाची टाळाटाळ…

हेमंत मोंडकर : महाराष्ट्र दिनी आत्मदहन, बेमुदत उपोषणाचा इशारा…

मालवण, ता . २८ : दांडी-मालवण लिंक रोडवर बांधकाम करून रस्त्यावर अडथळा केल्या प्रकरणी दांडी येथील नागरिकांनी प्रशासनाकडे धाव घेऊन तीन महिने उलटले तरीही प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे येथील सामाजिक कार्यकर्ते हेमंत मोंडकर यांनी प्रशासनाला १ मे रोजी बेमुदत उपोषण आणि आत्मदहनाचा इशारा दिला आहे. शेकडो स्थानिक भूमिपुत्रही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

श्री. मोंडकर म्हणाले, दांडी – मालवण किनारपट्टीवरील नागरिकांच्या सोईसाठी मालवण पालिकेने सन २०२० साली १ किलोमीटर लांबीचा रिंगरोड बांधला आहे. या रस्त्यासाठी गावातील नागरिकांनी आपल्या जमिनी दिल्या आहेत. परंतु एका जमीन मालकाने लिंक रोड साठी स्वतःची जमीन न दिल्यामुळे सुमारे १५ मीटर भागात रस्त्याचे काम रखडले होते. मात्र या भागातून वाहतूक सुरू होती. दरम्यान ३० जानेवारी रोजी याच वादातीत भागात जमीन मालकाने दगडी बांधकाम केल्यामुळे वाहतूक बंद झाली आहे. याप्रकरणी दांडी भागातील नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. येथील नागरिकांचा हा वर्षानुवर्ष पारंपरिक रस्ता आहे. या रस्त्यावर अडथळा करून तीन महिने उलटले आहेत. याबाबत प्रशासनाकडे वेळीच दाद मागूनही याप्रकरणी कोणतीही कार्यवाही झाली नाही. संबंधित रस्ता हा व्यवसाय, पर्यटन, आरोग्य आणि नागरिकांच्या अन्य मुलभूत बाबींसाठी महत्त्वपूर्ण आहे. सन २०२० साली जेव्हा पालिकेने संबंधित रस्त्याचे काम हाती घेतले तेव्हा काही जमीनदारांनी या रस्त्यास जमीन देण्यास नकार दिला होता. त्यावेळी मालवण पालिकेने महाराष्ट्र नगर परिषद कायदा कलम ७५ अन्वये जाहीर नोटीस देऊन सूचना व हरकती मागितल्या पाहिजे होत्या व भूसंपादन प्रक्रिया चालू करणे आवश्यक होते. असेही मोंडकर यांनी सांगितले.

तहसीलदार, पालिकेचे मुख्याधिकारी, आणि पोलिस निरीक्षकांना दिलेल्या नोटीसीत मोंडकर यांनी १ मे महाराष्ट्र दिनी दांडी लिंक रोड वरील प्रवेशद्वाराजवळ बेमुदत उपोषण आणि आत्मदहनाचे आंदोलन करणार असल्याचे कळविले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतरही दांडी लिंक रोडला सीआरझेड कायद्याप्रमाणे इमर्जन्सी रेस्क्यू रोडचा दर्जा देण्यास वर्षभर टाळटाळ करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी यांच्याकडून पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध एम सी झेड एम ए च्या एसओपी प्रमाणे कारवाई करण्यात तीन महिने टाळाटाळ करण्यात आली आहे. तहसीलदार यांच्याकडून सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध डी सी झेड एम सी ला अहवाल देण्यात तीन महिने टाळाटाळ करण्यात आली आहे. मालवण पालिकेकडून अनधिकृत बांधकाम करणाऱ्या विरुद्ध कारवाई करण्यात तीन महिने टाळाटाळ करण्यात आली आहे. रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात चार वर्ष अक्षम्य दिरंगाई केली आहे. त्याचप्रमाणे पोलीस निरीक्षकांकडून वहिवाट अडविणाऱ्या विरुद्ध फौजदारी कारवाई करण्यात टाळाटाळ केली आहे. वहिवाटीतील अडथळा दूर करणे हा कोणताही गुन्हा नसताना दांडीतील सजग स्थानिक भूमिपुत्रांना खोट्या केस मध्ये अडकविण्यात आले असल्याचे नोटीशीत म्हटले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments