विरोधकांकडे विकासाचे व्हिजन नसल्यामुळें आमचा विजय निश्चित;व्यक्त केला विश्वास
सावंतवाडी ता.१३: काँग्रेस-राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार बबन साळगावकर यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी विधानसभा पक्ष निरीक्षिका अर्चना घारे अखेर आज दाखल झाल्या आहेत.दरम्यान काही झाले तरी या निवडणुकीत “मिस्टर क्लीन” म्हणून संबोधल्या जाणाऱ्या बबन साळगावकर यांना येथील लोक नक्कीच आमदारकीची संधी देतील,असा विश्वास त्यांनी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.
सौ.घारे राष्ट्रवादी मधून येथील मतदारसंघात लढण्यास इच्छूक होत्या.त्यांनी एबी फॉर्म भरला होता.परंतु आयत्यावेळी पक्षाकडून त्यांना माघार घेण्यास सांगण्यात आल्याने गेले काही दिवस त्या अलिप्त होत्या.त्यामुळे त्या प्रचारात सहभागी होणार की नाही याबाबत उलटसुलट चर्चा होती.दरम्यान आज सकाळी त्यांनी श्री.साळगावकर यांच्या प्रचार कार्यालयात हजेरी लावली.
यावेळी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी साळगावकर यांना पाठिंबा दिला.”मिस्टर क्लीन” म्हणून आणि कोणताही डाग नसलेले श्री.साळगावकर हे निश्चितच निवडून येतील,असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावे,असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केले.यावेळी उमेदवार बबन साळगावकर,माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले,माजी जिल्हाध्यक्ष सुरेश गवस,विभावरी सुकी,रवींद्र म्हापसेकर,बाळा गावडे,पुंडलिक दळवी,नीता गावडे,रवींद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी घारे म्हणाल्या,अत्यंत स्वच्छ चारित्र्य असलेल्या बबन साळगावकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे येथील कार्यकर्त्यांची इच्छा आहे.त्याचा फायदा निश्चितच होणार आहे.साळगावकर यांच्या विरोधात असलेले दोन्ही उमेदवार एकमेकांच्या विरोधात उभी राहिल्यामुळे त्यांच्याकडून एकमेकावर खालच्या दर्जाचे टीका होत आहे हा सर्व प्रकार चुकीचा आहे त्यामुळे लोकांना टीका करून अंधारात न ठेवता विकासाचा मार्ग दाखवणाऱ्या साळगावकर यांच्या पाठीशी येथील जनतेने उभे राहावे