राजन तेलींचा आरोप: फसवणूक करणाऱ्या पालकमंत्र्यांना योग्य ती जागा दाखवा…
दोडामार्ग ता.१३: सावंतवाडी व दोडामार्ग मध्ये आलेल्या पुरपरिस्थितिनंतर पूरग्रस्तांसाठी देण्यात आलेला निधी मुख्यमंत्र्यांच्या निधीतून देण्यात आला,मात्र पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ क्रेडिट घेण्यासाठी हा निधी आपण दिला असल्याचे सांगून लोकांची फसवणूक केली.त्यामुळे अशी प्रवृत्ती दाखवणाऱ्या लोकांना येथील जनतेने योग्य ती जागा दाखवून द्यावी,अशी टीका भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजन तेली यांनी आज येथे केली.श्री.तेली यांनी आज दोडामार्ग मणेरी येथून आपल्या परिवर्तन यात्रेची सुरुवात केली.
यावेळी प्रमोद कामत,बाळा नाईक,अनिल शेटकर,संतोष नानचे,राजेंद्र निंबाळकर,एकनाथ नाडकर्णी,चंद्रशेखर देसाई,सूर्या गवस आदी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी त्यांनी त्याठिकाणी असलेल्या मंदिराला भेट दिली.तुमच्या देवाचा कौल मला मिळाला आहे.त्यामुळे माझा विजय निश्चित आहे.येणाऱ्या काळात निश्चितच येथील भागाचा विकास केला जाईल,असे त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र म्हापसेकर म्हणाले,श्री.तेली यांच्या माध्यमातून येथील मतदारसंघाचा विकास होणार आहे.विकासाचे व्हिजन असलेला हा नेता विधानसभेत जाणे गरजेचे आहे.त्यामुळे येथील जनतेने त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची गरज आहे.