Wednesday, May 21, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यातुळस घाटीत ब्रेक फेल झाल्याने रिक्षा पलटी, महिला गंभीर जखमी...

तुळस घाटीत ब्रेक फेल झाल्याने रिक्षा पलटी, महिला गंभीर जखमी…

वेंगुर्ले,ता.०९: मळगाव येथून वेंगुर्ला येथे येणाऱ्या रिक्षेचा तुळस घाटीतील उतारावर ब्रेक फेल झाल्याने झालेल्या अपघातात वायंगणी येथील आराध्या आदेश साळगावकर (वय ३०) या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना तातडीने गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. या अपघातात त्यांचा कमलाकांत आदेश साळगावकर हा पाच वर्षाचा बालक मात्र बालबाल बचावला. अपघातात जखमी झालेले रिक्षाचालक व अन्य महिला या दोघांवर वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडला.

याबाबत अधिक माहिती अशी की, दाभोली येथील रिक्षा चालक रुपेश सखाराम माडकर (वय ४४) हे रिक्षेने मळगाव ते वायंगणी असे प्रवासी भाडे घेऊन निघाले होते. यात सौ. साळगावकर व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा व त्यांच्या भगिनी सौ. ऋतुजा राजा कुडाळकर ( वय २८) व त्यांचा पाच वर्षाचा मुलगा रोहन राजा कुडाळकर अशी माणसे प्रवास करत होती. तुळस घाटीतील मोठ्या उतारावर येताच रिक्षेचे ब्रेक फेल झाल्याने रिक्षा पलटी झाली. या अपघातात आराध्या साळगावकर, ऋतुजा कुडाळकर व रिक्षाचालक रुपेश माडकर यांच्या डोक्याला दुखापत झाली. खासगी वाहनाने जखमींना वेंगुर्लातील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. आराध्या या गंभीर जखमी झाल्याने त्यांना गोवा येथील मेडिकल कॉलेजच्या रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. त्यानंतर वेंगुर्ले पोलीस निरीक्षक संदीप भोसले, हेडकॉन्स्टेबल रूपा वेंगुर्लेकर, रंजिता चव्हाण, बंटी पालकर व महिला पोलीस कुंभे यांनी उपजिल्हा रुग्णालयात येत जखमींची भेट घेत अपघाताबाबत माहिती घेतली. याबाबत अधिक तपास सुरू आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments