मालवण, ता. १० : शहरातील मेढा येथील किल्ले राजकोट येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ उद्या दुपारी १२.३० वाजता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. या समारंभाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
किल्ले राजकोट येथे नव्याने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहे. काल माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे यांनी किल्ले राजकोट येथे भेट देत पाहणी केली. उद्या या पुतळ्याचे दर्शन व पूजन समारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे.
या सोहळ्यास राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खासदार नारायण राणे, सार्वजनिक बांधकामचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दीपक केसरकर, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, निलेश राणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनीषा पाटणकर – म्हैसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सदाशिव साळुंखे, संजय दशपुते, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक कोकणचे मुख्य अभियंता शरद राजभोज, जिल्हाधिकारी अनिल पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास शिवप्रेमी मालवणवासीयांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र किणी, अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, सहायक अभियंता अजित पाटील यांनी केले आहे.