वराड सोनवडेपार पुलाचे काम लवकरच सुरू…

2

दत्ता सामंत यांचा मुख्यमंत्री स्तरावर यशस्वी पाठपुरावा ; ग्रामस्थांतून समाधान व्यक्त…

मालवण, ता. १३ : लोकसभा निवडणुकीपूर्वी पालकमंत्री, आमदार, खासदारांच्या हस्ते मोठा गाजावाजा करून भूमीपुजन होऊनही रखडलेल्या तालुक्यातील वराड सोनवडेपार पुलाच्या कामाला अखेर मुहूर्त मिळाला. रखडलेल्या कामाबाबत ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांचे लक्ष वेधल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री स्तरावर केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे. हे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्री कार्यालयातून दिले आहेत.
या प्रश्नी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सहकार्य मिळाले. गेले आठ महिने भूमिपूजन होऊनही रखडलेल्या कामाला चालना मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून वराड सोनवडेपार पुलाला मंजुरी मिळाली होती. लोकसभा निवडणुकीपूर्वी पालकमंत्री दीपक केसरकर, आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत आदींच्या हस्ते घाईगडबडीत या पुलाचे भूमीपुजन करण्यात आले. मात्र काही परवानग्या प्रलंबित असल्याने हे काम रखडले होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत हे गावात गेले असता ग्रामस्थांनी ही बाब त्यांच्या निदर्शनास आणली. यावेळी माजी मुख्यमंत्री खास. नारायण राणे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून श्री. सामंत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधून ही बाब त्यांच्या कानी घातली असता हे काम तत्काळ सुरू करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत अशी माहिती स्वाभिमान पक्षाच्यावतीने देण्यात आली आहे. अखेर हे काम मार्गी लागल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

8

4