जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनाचा खेळाडूंना फटका…
मालवण, ता. १३ : शालेय जिल्हा स्तरीय १४, १७, १९ वर्ष वयोगटातील प्रथम व द्वितीय क्रमांक विजेते खेळाडू सातारा येथे विभागीय शालेय मैदानी स्पर्धेसाठी पोहचले. पावसाच्या व्यत्ययामुळे स्पर्धा रद्द करण्यात आल्या. २३० खेळाडू किमान शंभर क्रीडाशिक्षकांना स्पर्धेविना माघारी परतावे लागले .
विभागीय स्पर्धा रद्द झाल्याचा संदेश सातारा व्हाया सिंधुदुर्ग आल्याने तो वेळेत शाळांना, क्रीडाशिक्षक, खेळाडूंना मिळाल्याने आर्थिक भुर्दंड सोसावा लागला. मैदानी स्पर्धेसारखी महत्वपूर्ण स्पर्धा घाईघाईत न घेता पुर्ण पावसाळा संपल्यावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी असताना बरोबर परतीच्या पावसाच्या कार्यकाळात स्पर्धा आयोजित केल्याने हा आर्थिक भुर्दंड खेळाडूंच्या माथी मारण्याचे काम जिल्हाक्रीडाधिकाऱ्यांनी केले आहे.
स्पर्धा रद्द झाली आहे हे समजल्यावर तत्परता दाखवून विजयी शाळांना तशी प्रत्यक्ष फोनवरून कल्पना देऊन खेळाडू, क्रीडाशिक्षकांना जिल्ह्यात वेळीच थांबवले असते तर हा आर्थिक भुर्दंड वाचला असता. वाॅटस्अप मेसेज ग्राह्य धरण्यात येऊ नये , नेटची व्यवस्था जिल्ह्यात सुरळीत होत नाही तोवर शाळांना प्रत्यक्ष संपर्क करावा अशी मागणी
सिंधुदुर्ग जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ यांची असताना अतिरिक्त कार्यभार असलेल्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांकडून त्याला हरताळ फासण्यात येत आहे. त्यामुळे अपुऱ्या कर्मचारी वर्गासहीत फक्त आठवड्यातून एक दिवस जिल्ह्यात हजर असलेल्या जिल्हा क्रीडाधिकाऱ्यांबद्दलचा असंतोष वाढत चालला आहे .
ऑक्टोबर महीन्यात एकाचवेळी आठ विभागीय स्पर्धांचे आयोजन करून वेठीस धरलेल्या खेळाडू, क्रीडाशिक्षकांची पुरती तारांबळ उडवुन दिली आहे. स्पर्धा खेळाडूंसाठी की स्पर्धेसाठी खेळाडू हेच समजत नसल्याने
हा सर्व घोळ टाळण्यासाठी जिल्ह्यात पुर्ण वेळ जिल्हा क्रीडाधिकारी मिळावा, खेळाडूंना होणारा त्रास कमी व्हावा यासाठी मागणी जोर धरू लागली आहे.
विभागीय स्पर्धा रद्द झाल्याचा संदेश प्रत्यक्ष न दिल्याने झालेल्या नुकसानीची भरपाई जिल्हा क्रीडाकार्यालयाने दिली पाहीजे अशी मागणी क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष अजय शिंदे, कार्याध्यक्ष विजय मागाडे, सचिव नंदकिशोर नाईक, विजय मयेकर, शंकर पराडकर, मारुती माने, जयराम वायंगणकर, एच. आर. सावंत, अजय सावंत, सुदिन पेडणेकर, ऊत्तरेश्वर लाड, विजय मळगावकर, वैभव कोंडस्कर, राजेंद्र परब, महेंद्र वारंग, सुभाष सावंत, कमलेश गोसावी, संतोष तावडे, महेश जाधव, जयकुमार पाटील, संजय परब, रवीकांत कदम यांच्यासह अन्यायग्रस्त क्रीडाशिक्षकांनी केली आहे.