दत्ता सामंत; कणकवलीचे पार्सल पाठविण्याची शेवटची संधी….
मालवण, ता. १४ : मालवण तालुक्याचा आमदार म्हणून नारायण राणे यांनी २५ वर्षे काम केले. पण त्यांनी या काळात मालवणचे नाव राजकीय दृष्टया राज्यात व देशात पोचविले. त्यांनी आपल्या अभ्यासाच्या जोरावर कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशी जबाबदारी निभावली. मात्र, त्यांचा पराभव करून निवडून आलेल्या वैभव नाईक यांनी गेल्या पाच वर्षात काय केले ? हे तुमच्या समोर आहे. त्यामुळे आता पार्सल आमदाराची आपल्याला गरज नाही. पार्सल परत पाठविण्याची ही शेवटची संधी आहे. ‘अभी नही तो कभी नही’, असे आवाहन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांनी आंबडोस येथे केले.
भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांच्या प्रचारार्थ सामंत यांची प्रचारसभा आंबडोस गावच्या रवळनाथ मंदिरात झाली. यावेळी स्वाभिमान तालुकाध्यक्ष राजा गावडे, सरपंच राधा वरवडेकर, बाबू बिरमोळे, बाळा धुरी, बाळा नाईक, बबन कदम, माजी सरपंच विष्णु परब, ग्राम पंचायत सदस्य विजया साळगांवकर, भाऊ सामंत, बाळा आरोसकर, आप्पा परब यांच्यासह शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी या गावातील स्वाभिमान पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, दत्ता सामंत यांचा उमेदवारी अर्ज षडयंत्र राबवून आम. वैभव नाईक यांनी बाद केल्याने त्याचा राग येथील ग्रामस्थांना आला. श्री. सामंत यांचे गावची ग्रामदेवता श्री देव रवळनाथ यांच्या मंदिर उभारणीस मिळालेले सहकार्य लक्षात घेवून ग्रामस्थांनीच एकत्र येत सामंत यांना पाठिंबा दिला. त्यामुळे अपक्ष उमेदवार रणजीत देसाई यांना जास्तीत-जास्त मतदान करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
श्री.सामंत म्हणाले, मी जनतेच्या मनातील उमेदवार होतो. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरताना मला लाभलेला प्रतिसाद पाहुन आम. नाईक यांनी राजकीय दबाव आणून माझा उमेदवारी अर्ज बाद केला. मात्र, खोटे करणाऱ्या व्यक्तीला देव शिक्षा देत असतो. माझा अर्ज जरी बाद केला असला तरी रणजीत देसाई यांच्या रूपाने प्रशासनाची उत्तम जान असलेला उमेदवार आम्हाला मिळाला आहे. विशेष म्हणजे हा उमेदवार स्थानिक आहे. आम्हाला पार्सल मागवावे लागलेले नाही. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या. या मतदार संघातील पार्सल संस्कृती आता बदलण्याची वेळ आली आहे. ती ही शेवटची संधी आहे. त्यामुळे सहा नंबरच्या कपाट या निशाणी समोरील बटन दाबून हे परिवर्तन घडवूया, असे आवाहन त्यांनी केले.