Tuesday, June 17, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्यामालवणात खंडीत वीज प्रश्नी ठाकरे शिवसेनेची महावितरणवर धडक...

मालवणात खंडीत वीज प्रश्नी ठाकरे शिवसेनेची महावितरणवर धडक…

वीज ग्राहकांना नुकसान भरपाई मिळायला हवी – हरी खोबरेकर…

 

मालवण, ता. २२ : मालवण तालुका पहिल्याच पावसात ३० तासापेक्षा जास्त काळ अंधारात राहिल्याने संतप्त ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना घेराओ घालत जाब विचारला. वीज ग्राहकांना नुकसान भरपाई मिळायला हवी अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली. यावर अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाई बाबत शासन निर्णयाची माहिती दिली. तसेच दिवसभरात वीज पुरवठा सुरळीत होईल, असे स्पष्ट करण्यात आले. दरम्यान कोणत्याही राजकीय पक्षांची तळी उचलू नका असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांना दिला.

अवकाळी पावसाने तालुक्याला झोडपून काढले. पहिल्याच पावसात तालुक्यातील वीज पुरवठा खंडित झाला. गेले तीन दिवस शहरासह परिसरातील वीज पुरवठा खंडित राहिल्याने मच्छीमार, पर्यटन व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यामुळे संतप्त बनलेल्या ठाकरे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज येथील महावितरणच्या कार्यालयात धडक देत अधिकाऱ्यांना घेराओ घातला. महावितरणचे अभियंता सचिन मेहेत्रे यांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नितीन वाळके, बाबी जोगी, महेंद्र म्हाडगुत, मंदार ओरसकर, दीपा शिंदे, निनाक्षी शिंदे, पूनम चव्हाण, भाग्यश्री खान, यशवंत गावकर, प्रसाद आडवणकर, बंड्या सरमळकर, नरेश हुले, चिंतामणी मयेकर, किशोर गावकर, दत्ता पोईपकर, गणेश चव्हाण, कुणाल साळुंखे यांच्यासह ठाकरे शिवसेनेचे अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

शहरासह, तालुक्यातील अनेक गावांचा वीज पुरवठा खंडित राहिल्याने अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. अनेक नागरिक वीज वाहिन्यांवर आलेली झाडी तोडण्याची मागणी करत असताना महावितरण कडून याची कार्यवाही का झाली नाही. हे काम आमचे आहे की महावितरणचे. गँग कोणी उपलब्ध करून द्यायची आहे? काल वीज पुरवठा खंडित राहिल्यावर तुम्ही यांनी मदत केली असे सांगत असाल तर कोणती मदत केली ते सांगा. महावितरणकडे आवश्यक साधन सामुग्री आहे का? पावसाळा सुरू होण्यापूर्वी या सगळ्यांचा आढावा घेणे आवश्यक होते. मात्र ही बैठक का घेतली नाही असा प्रश्नाचा भडिमार हरी खोबरेकर यांनी केला. नुकसान भरपाई संदर्भात महावितरणने अधिकृत माहिती ग्राहकांना द्यावी. यात महावितरणकडून हयगय झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही श्री. खोबरेकर यांनी यावेळी दिला.

आजही शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडित आहे. अनेक भागात कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने हॉटेल तसेच अन्य व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. ही नुकसान भरपाई महावितरण देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. तुम्ही राजकीय पक्षांची तळी उचलण्याचे काम करू नका असा इशाराही यावेळी अभियंत्यांना देण्यात आला.

महावितरणमुळे ग्राहकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे या नुकसान भरपाईसाठी ग्राहक कक्ष सुरू करण्यात यावा तसेच येणाऱ्या ग्राहकांचा नुकसान भरपाईचा अर्ज भरण्यात यावा अशी सूचना महावितरणच्या अधिकाऱ्यांना करण्यात आली. यावेळी ठाकरे शिवसेनेच्या वतीनेही तालुका कार्यालयात नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी यंत्रणा उभारण्यात येणार असून याठिकाणी अर्ज भरून दिले जाणार आहेत असेही श्री. खोबरेकर यांनी यावेळी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments