२४ तास सेवा उपलब्ध; वेळेत आणि अचूक माहिती उपलब्ध करून देणार…
कुडाळ, ता.२४: सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे वीज पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. वादळी वाऱ्याने पोल पडणे आणि झाडांच्या फांद्या वीज वाहिन्यांवर पडून वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना वेळेत आणि अचूक माहिती मिळावी यासाठी महावितरणने कुडाळ येथे नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे.
जिल्ह्यातील वीज ग्राहक आपत्कालीन परिस्थितीत ७८७५७६५०१९ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात. हा क्रमांक ग्राहकांच्या सेवेसाठी चोवीस तास सुरू असणार आहे. महावितरणने विजेसंबंधीच्या सर्व तक्रारींसाठी तीन टोल-फ्री क्रमांक उपलब्ध करून दिले आहेत: १८००२३३३४३५ , १८००२१२३४३५, १९१२ या टोल-फ्री क्रमांकांवर मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राद्वारे २४ तास सेवा दिली जाते. याव्यतिरिक्त ग्राहक आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून ०२२-५०८९७१०० या क्रमांकावर मिस कॉल देऊन वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार नोंदवू शकतात.