भरत गोगावले; रोजगार हमी योजना अधिक प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना…
सिंधुदुर्गनगरी, ता.२४: फलोत्पादन योजना गावागावात राबवण्यासाठी प्रयत्न करा, बांबू लागवडीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्यामुळे या बांबू लागवडीला प्रोत्साहन द्या, असे आवाहन राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी आज येथे केले. दरम्यान रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी महत्वाची योजना आहे. यामुळे ग्रामीण भागात मोठे बदल होत आहेत. त्यामुळे या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे हातात घ्या, असे त्यांनी सांगितले. श्री. गोगावले यांच्या उपस्थितीत आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी अनिल पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिक दिवे, रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी नितीन राऊत तसेच संबंधित विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
श्री गोगावले पुढे म्हणाले की, रोजगार हमी योजना विभागामार्फत जिल्ह्यात कामांची संख्या वाढविणे आवश्यक आहे. फलोत्पादन विभागांच्या योजनांचा प्रसार आणि प्रचार करुन योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. गट विकास अधिकाऱ्यांना दिलेले उद्दिष्ट्य पूर्ण करावे. बांबु लागवडीमधून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळत असल्याने बांबू लागवडीला देखील प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.