प्रकाश मेस्त्री ; चिंदर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार…
आचरा, ता. १२ : दहावी, बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यानी पुढे यशस्वी होण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडून ध्येय निश्चित करा आणि त्यासाठी कठोर मेहनत करा यश निश्चित मिळेल. तसेच आयपीएस सुब्रमण्य केळकर, राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्याकडून अभिनंदन पात्र अभियंता कै. वसंत दिनकर मेस्त्री यांनी चिंदर गावात मराठी माध्यम शाळेतच शिक्षण घेऊनच यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत केली. त्यांचा आदर्श आपण नेहमी घ्या असे प्रतिपादन श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांनी चिंदर वाचनालय येथे आयोजित गुणगौरव समारंभात केले.
ते म्हणाले की, हा गुणगौरव सोहळा फक्त निमित्त असून माझ्या गावातील विद्यार्थ्यांच्या पाठिवर कौतुकाची थाप द्यावी हाच आमचा प्रामाणिक उद्देश आहे तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यास आपण तत्पर आहोत.
श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालय चिंदरच्यावतीने चिंदर गावातील दहावी, बारावीत विशेष प्राविण्य मिळवत अग्रक्रमाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ श्री देवी सरस्वती वाचनालय चिंदर गावठणवाडी येथे पार पडला. यामध्ये कोमल संतोष अपराज, इयत्ता दहावी, शाळा जनता विद्या मंदिर त्रिंबक मध्ये प्रथम क्रमांक कुंदन धनंजय नाटेकर, इयत्ता दहावी, शाळा न्यू इंग्लिश स्कूल आचरा, मराठी माध्यम, व्दितीय क्रमांक दिनेश प्रफुल्ल माळगांवकर, इयत्ता दहावी, न्यू इंग्लिश स्कूल आचरा, इंग्रजी माध्यम, प्रथम क्रमांक, अनुष्का विकास हडकर, इयत्ता दहावी, शाळा न्यू इंग्लिश स्कूल आचरा, व्दितीय क्रमांक मयुरेश भानजी साटम, इयत्ता बारावी, कनिष्ठ महाविद्यालय आचरा, वाणिज्य विभागासह कनिष्ठ महाविद्यालयात प्रथम वैष्णवी आनंद परब, इयत्ता बारावी, शाळा कनिष्ठ महाविद्यालय आचरा, कला विभाग, प्रथम क्रमांक गौरव अनिल लब्दे, इयत्ता बारावी, शाळा, कनिष्ठ महाविद्यालय आचरा, कला विभाग, व्दितीय क्रमांक यांचा सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, भेट वस्तू देऊन गौरव करण्यात आला.
वाचनालय कार्यकारीणी सदस्य महेंद्र मांजरेकर, रावजी तावडे यांनी ही यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
चिंदर ग्रामपंचायत मधून बदली झालेले प्रभारी ग्रामपंचायत अधिकारी मंगेश साळसकर यांचाही वाचनालयच्या वतीने शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, संविधानाच्या पुस्तकाची प्रत देवून अध्यक्ष प्रकाश मेस्त्री व वाचनालय कार्यकारीणीच्या वतीने सन्मान करण्यात आला. श्री. साळसकर म्हणाले की, चिंदर गावाने मला खूप प्रेम दिले. तीन वर्षांच्या कालावधीत आपण योग्य निर्णय घेतले. गावातील शेवटच्या घटकांपर्यंत शासनाच्या योजना पोचवण्याचा प्रयत्न केला यात आपण समाधानी आहोत. तसेच विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत संधी प्राप्त करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा आणि एक कर्तव्यदक्ष अधिकारी व्हा. आपल्या माता पित्यांसह गावाचे, देशाचे नाव उज्ज्वल करा असाही सल्ला साळसकर यांनी यावेळी दिला.
चिंदर ग्रामपंचायत कडून प्रतिवर्षी श्री देवी सरस्वती वाचनालय व ग्रंथसंग्रहालयला पुस्तके भेट दिली जातात. यावर्षीही सुमारे वीस हजार रुपये किंमतीची पुस्तके देण्यात आली असून या पुस्तकांचे वितरण सरपंच नम्रता महंकाळ-पालकर यांच्या हस्ते वाचनालय अध्यक्ष प्रकाश मेस्त्री यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.
यावेळी ग्रंथपाल नम्रता महंकाळ-पालकर, प्रकाश खोत, विवेक परब, गोपाळ चिंदरकर, संतोष अपराज, भूषण दत्तदास, प्रफुल्ल माळगांवकर, अनिल लब्दे, रणजित दत्तदास, रोहित पाटील, तुषार पवार, वाचक, वाचनालय सभासद आदी उपस्थित होते. प्रास्ताविक रावजी तावडे यांनी तर सूत्रसंचालन आणि आभार सहसचिव सिध्देश गोलतकर यांनी मानले.