चौकेतील चर्मकार बांधवांचा विधानसभा निवडणुकीवर सामुहिक बहिष्कार…

96
2
Google search engine
Google search engine
Google search engine

 

ग्रामपंचायतीने विकासापासून वंचित ठेवले ; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवेदन सादर…

मालवण, ता. १५ : तहसीलदार, गटविकास अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कार्यवाही न करता चौके ग्रामपंचायतीने चर्मकार बांधवांना विकासापासून वंचित ठेवले आहे असा आरोप चौके गावातील चर्मकार वाडीतील ग्रामस्थांनी केला आहे. चौके ग्रामपंचायतीच्या कारभाराला कंटाळून येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर सामूहिक बहिष्कार घालण्याचा निर्णय चर्मकार बांधवांनी घेतला आहे. याबाबतची माहिती चर्मकार बांधवांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिली आहे.
येथील तहसीलदारांनी चालू वहिवाट दाव्यानुसार आम्हा चर्मकारवाडीत पूर्वापार जाणारी पाच फूट रुंदीची पायवाट मंजूर करून या पायवाटेची नोंद गाव दप्तरी करण्याचे आदेश दिले. त्यांच्या आदेशाने या पायवाटेची नोंद चौके मंडळ अधिकार्‍यांनी फेरफार नमुना ६ नंबरमध्ये केली. या फेरफारच्या नोंदीनुसार गटविकास अधिकार्‍यांनी चौके ग्रामपंचायतीला तत्काळ गाव नमुना नं. २३ ला या पायवाटेची नोंद करण्याचे आदेश दिले. तहसीलदार व गटविकास अधिकार्‍यांनी मागासवर्गीयांच्या विकासाच्या दृष्टीने तत्काळ निर्णय घेतले. मात्र चौके ग्रामपंचायत चर्मकारवाडीचा विकास होऊ नये यादृष्टीने कामकाज करत आहेत. तहसीलदार आणि गटविकास अधिकार्‍यांच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ करत आहेत. गटविकास अधिकार्‍यांच्या आदेशाने कार्यवाही केल्याचे पत्र ग्रामपंचायत गटविकास अधिकार्‍यांना पाठविते पण नमुना नं. २३ ची मागणी केली असता गटविकास अधिकार्‍यांचे लेखी पत्र घेऊन या तरच उतारा देतो असे ग्रामसेवक सांगतात. दुसरे पत्र संबंधित पायवाट कोठून कोठे जाते हे ग्रामपंचायतीला माहित असतानाही गटविकास अधिकारी आणि तहसिलदारांना पाठवून चौके येथे प्रत्यक्ष जागेवर येऊन ती पायवाट कोठून कोठे जाते याची पंचयादी घालून पायवाट ग्रामपंचायतीच्या ताब्यात दिल्यास त्याची नोंद २३ नं. ला करण्यात येईल असेही पत्र पाठवून चर्मकार वाडीतील लोकांची आणि अधिकार्‍यांची दिशाभूल करण्याचे काम ग्रामपंचायत करत आहे, असे चौके चर्मकार वाडीतील चर्मकार बांधवांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे चौके ग्रामपंचायतीच्या कारभाराला कंटाळून चर्मकारवाडीतील मतदार यावेळी होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर सामुहिक बहिष्कार घालत आहोत. जोपर्यंत मागासवर्गीयांच्या विकासाच्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न होत नाहीत तोपर्यंत हा बहिष्कार असाच चालू राहील असे चर्मकार बांधवांनी म्हटले आहे.
या निवेदनावर चौके चर्मकार वाडीतील विनायक चौकेकर, चंद्रशेखर चौकेकर, गणेश चौकेकर, बुधाजी चौकेकर, धर्मेंद्र चौकेकर, मनोजकुमार चौकेकर, विराज चौकेकर, वैभव चौकेकर, सुनील चौकेकर, परेश चौकेकर, सुहासिनी चौकेकर, विशाखा चौकेकर, सुलोचना चौकेकर, शोभा चौकेकर, हेमलता चौकेकर, प्रवीण चौकेकर, रवींद्र चौकेकर, अशोककुमार चौकेकर, राजेश चौकेकर, गौरव चौकेकर, स्नेहा चौकेकर, राजश्री चौकेकर, भास्कर चौकेकर, संजना चौकेकर, मानसी चौकेकर, हेमा चौकेकर, प्रभावती चौकेकर, गीता चौकेकर, सेजल चौकेकर यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

\