सावंतवाडी,ता.१२: कोकण कला व शिक्षण विकास संस्थेने श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी येथे सामाजिक उपक्रमांतर्गत ८५५ गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय दप्तर आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. यावेळी कोकण सादचे संपादक संदीप देसाई, सावंतवाडी संस्थानचे युवराज लखमराजे भोसले, सामाजिक कार्यकर्ते बाळू देसाई, सावंतवाडीच्या माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे, प्रहारचे प्रवीण परब, सकाळचे हेमंत खानोलकर, सिंधुदुर्ग प्रसारक मंडळाचे जयप्रकाश सावंत, पंचम खेमराजचे देविदास बोर्डे, प्राध्यापक रुपेश पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
यावेळी संदीप देसाई म्हणाले की, कोकण संस्था ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जो शैक्षणिक आधार उभा करत आहे, तो अत्यंत प्रशंसनीय आहे. शासनाच्या योजनेसोबत अशा स्वयंसेवी संस्थांचे योगदान महत्त्वाचे ठरते. प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी अशी सामाजिक बांधिलकी आवश्यक आहे. संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल म्हणाले, महाराष्ट्रातील वंचित मुलांना शिक्षण आणि आरोग्य यांसारख्या मूलभूत गरजा पुरवून त्यांना चांगले जीवन प्राप्त करण्यास आम्ही सक्षम बनवू. विद्यार्थ्यांना कोणत्याही शैक्षणिक साहित्याची कमी भासू नये. त्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये, यासाठी कोकण संस्था सातत्याने कार्यरत आहे.
या उपक्रमांतर्गत शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी मोलाचे सहकार्य केले. कोकण संस्थेच्या वतीने साक्षी पोटे, ऋचा पेडणेकर, गौरी आडेलकर, हर्षला अमूप, बिना अहिरे, सुरज कदम, प्रथमेश सावंत, अमित पाटील, वैष्णवी म्हाडगूत, अवंती गवस, सत्यवान भगत, चेतन धरणे, अमोल गुरम सह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन समीर शिर्के यांनी केले तर प्रीती पांगे यांनी आभारप्रदर्शन केलं. अशा उपक्रमांद्वारे शिक्षणाचा प्रकाश ग्रामीण भागांपर्यंत पोहोचवत, समाजात सकारात्मक बदल घडवण्याचं कार्य कोकण संस्था यशस्वीरित्या पार पाडत आहे. हा उपक्रम यापुढेही सातत्याने सुरू राहील, असे आश्वासन कोकण संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांनी दिले.