Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याज्येष्ठ लेखक जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनिल गवस...

ज्येष्ठ लेखक जयंत पवार स्मृती संमेलनाच्या अध्यक्षपदी अभिनेते अनिल गवस…

कणकवली, ता.१३ : सिंधुदुर्ग सुपुत्र मराठीतील साहित्य अकादमी विजेते ज्येष्ठ कथाकार, नाटककार,नाट्य समीक्षक जयंत पवार स्मृती संमेलन समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग आणि बॅ. नाथ पै सेवांगण मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने २२ जून रोजी स. १० वा.मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगणच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ अभिनेते – नाट्यदिग्दर्शक अनिल गवस यांची निवड करण्यात आली असल्याची माहिती समाज साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष मधुकर मातोंडकर,कार्यवाह सुरेश बिले, बॅ. नाथ पै सेवांगणचे कार्याध्यक्ष पद्मनाभ शिरोडकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग सुपुत्र जयंत पवार हे मराठीतील अग्रगण्य कथालेखक नाटककार आणि नाट्यसमीक्षक. त्यांच्या फिनिक्सच्या राखेतून उठला मोर या बहुचर्चित कथासंग्रहाला साहित्य अकादमी हा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. अधांतर या त्यांच्या नाटकाने इतिहास निर्माण केला. गिरणी कामगारांची फरपट झालेल्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या या नाटकावर ‘लालबाग परळ झाली सोन्याची मुंबई या गाजलेल्या चित्रपटाचीही निर्मिती करण्यात आली होती. नाट्य समीक्षक म्हणून जयंत पवार विख्यात होते. अखिल भारतीय विद्रोही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांचा सन्मान करण्यात आला होता. त्यांच्या स्मरणार्थ समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्ग ही चळवळ राबविण्यात येत असून जयंत पवार यांच्या आठवणी आणि साहित्याचा जागर व्हावा या उद्देशाने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षपदी जयंत पवार यांचे जवळचे सहकारी, त्यांच्या नाटकाचे दिग्दर्शक, त्यांच्या नाटकातील अभिनेते अनिल गवस यांची निवड करण्यात आली असून अनिल गवस हे सुद्धा सिंधुदुर्ग दोडामार्गचे सुपुत्र आहेत. संभाजी मालिकेतील हंबीरराव ही त्यांची भूमिका अतिशय लोकप्रिय झालेली आहे. नाटकाचे व्यासंगी कलावंत अशी सुद्धा अनिल गवस यांची ओळख आहे.

संमेलनाचे उद्घघाटन संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक ॲड. देवदत्त परुळेकर हे करणार असून उद्घघाटन सत्रानंतर जयंत पवार यांचे कथात्म साहित्य या विषयावर नामवंत समीक्षक आणि जयंत पवार यांच्या साहित्याचे अभ्यासक डॉ.दत्ता घोलप (वाई) यांचे व्याख्यान होणार आहे. तर संमेलनाच्या तिसऱ्या सत्रात अभिनेते अनिल गवस यांची  जयंत माणूस आणि लेखक कलावंत या विषयावर प्रकट मुलाखत होणार असून त्यांच्याशी ज्येष्ठ रंगकर्मी विलास कोळपे (संगमेश्वर) हे संवाद साधणार आहेत. दरम्यान या संमेलनात समाज साहित्य प्रतिष्ठानने प्रकाशित केलेल्या मराठीतील ७५ कवींच्या ७५ कवितांचा सृजनरंग हा काव्यसंग्रह तसेच कवी हरिचंद्र भिसे यांचा खरवड हा मालवणी बोलीतील काव्यसंग्रह प्रकाशित करण्यात येणार आहे.

तर ज्येष्ठ कवयित्री संध्या तांबे यांच्या अध्यक्षतेखाली मराठीतील ५५ निमंत्रित कवीच्या सहभागाने कविसंमेलन रंगणार आहे. मराठी साहित्यातील अनेक नामवंत साहित्यिक या संमेलनाला उपस्थित राहणार असून रसिकांनी संमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क – ९७६४९६४४०५

संमेलनातील विशेष कार्यक्रम म्हणजे अभिनेते अनिल गवस यांची प्रकट मुलाखत! या मुलाखतीमध्ये जयंत पवार यांच्या लेखन आणि एकूण वाटचालीविषयी ते भाष्य करतीलच परंतु गवस यांची नाट्य – चित्रपट ही वाटचाल कशी सुरू झाली याविषयीही भाष्य असेल तरी या मुलाखतीचा आस्वाद रसिकांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments