प्रवाशांची गैरसोय ; सर्व फेऱ्या नियमित सोडण्याचे आगार व्यवस्थापकांचे आश्वासन…
मालवण, ता. १३ : आंबेरी गावासाठी असलेल्या एसटी बसफेऱ्या संदर्भात आज जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्या नेतृत्वाखाली सरपंच मनोज डिचोलकर अन्य पदाधिकारी, ग्रामस्थांनी येथील आगारात धडक देत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी आंबेरी गावासाठी ज्या ज्या फेऱ्या आहेत त्या सुरू ठेवण्यात येतील असे आश्वासन आगार व्यवस्थापकांनी शिष्टमंडळास दिले.
येथील एसटी आगारास जिल्हा बँक संचालक बाबा परब यांच्यासह उपसरपंच रविंद्र परब, सदस्य गणेश डिचोलकर, कमलेश वाक्कर, पूर्वा मुसळे, सुचिता कांबळी, वृंदा केळुसकर, मीनल सामंत, बूथ अध्यक्ष नीलेश मुसळे, पोलीस पाटील धनंजय आंबेरकर यांच्यासह अन्य ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने भेट दिली.
आंबेरी गावासाठी सुरू असलेल्या अनेक एसटी बसफेऱ्या नियमित नसल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. याबाबत आगार व्यवस्थापकांचे लक्ष वेधण्यात आले. त्यानुसार आगार व्यवस्थापकांनी ५. ३० वाजताची, दुपारी १.१५ वाजताची, ७.३० वाजताची मालवण आंबेरी, ८.३० वाजताची मालवण कुडाळ व्हाया आंबेरी, ४.३० वाजताची कुडाळ मालवण व्हाया आंबेरी, दुपारी १ वाजताची कुडाळ मालवण व्हाया आंबेरी, ४.३० वाजताची मालवण कुडाळ व्हाया आंबेरी या सर्व फेऱ्या नियमित वेळेत सोडण्याचे संबंधितांना सूचना करण्यात आले असल्याचे आगार व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. याबाबतचे लेखी पत्र त्यांनी सरपंच मनोज डिचोलकर यांना दिले आहे.