सावंतवाडी, ता.१४: सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे खजिनदार, तथा माजी कबड्डीपट्टू मार्टिन आल्मेडा यांची १८ वर्षाखालील पहिल्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता निवड समिती सदस्य म्हणून राज्य कबड्डी संघटनेकडून नियुक्ती करण्यात आली आहे.
ही स्पर्धा दि. १४ ते १८ जून या कालावधीत पुणे-बालेवाडी येथे राज्य संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली आहे. अल्मेडा हे कॅथलिक बँकेचे सेक्रेटरी असून ते सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने गेली २५ वर्षे कबड्डी प्रशिक्षक म्हणून जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांनी हॉली क्रॉस मंडळाची स्थापना करून मुला-मुलींचे संघ तयार केले आहेत. सतत मैदानात उपस्थित राहून खेळाडूंना प्रशिक्षित करणे हा त्यांचा छंद आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक राज्य व राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडविले आहेत. त्यापैकी अनेक खेळाडू आज पोलीस दल, सैन्य दल, कंपन्या तसेच अनेक शासकीय कार्यालयात काम करत आहेत. कोकण रेल्वेच्या कबड्डी संघाचे त्यांनी प्रशिक्षक पद सुद्धा भुषविलेले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक वर्षे निवड समिती सदस्य म्हणून काम करत असताना राज्यस्तरावर सुद्धा त्यांनी निवड समिती वर उत्कृष्ट काम केलेले आहे. त्यांच्या ह्या योगदानाचा विचार करून आल्मेडा
यांना राज्यस्तरावर निवड समिती सदस्य म्हणून निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्या ह्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या वतीने व खेळाडूंच्या वतीने कार्यवाह दिनेश चव्हाण यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या . सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनचे अध्यक्ष रुजारीओ पिंटो, उपाध्यक्ष ॲड. अजित गोगटे , दिलीप रावराणे , तुषार साळगावकर , कार्याध्यक्ष संजय पेडणेकर व अन्य पदाधिकाऱ्यांनी , पंच व कार्यकर्त्यांनी आल्मेडा यांचे अभिनंदन केले आहे .