Monday, July 7, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्याकेएफडब्लू संस्थेच्या प्रतिनीधींची जिल्हा बँकेच्या युपीएनआरएम प्रकल्पास भेट...

केएफडब्लू संस्थेच्या प्रतिनीधींची जिल्हा बँकेच्या युपीएनआरएम प्रकल्पास भेट…

ओरोस,ता.१६: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जर्मनी येथील केएफडब्लू संस्था व नाबार्ड यांच्या अर्थसाहाय्यातून कुडाळ तालुक्यातील निवजे येथील नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प (युपीएनआरएम) राबविला होता. पाच कोटी ६० लाख रुपये किमतीचा असलेल्या या प्रकल्पामध्ये दुधाळ जनावरे, बायोगॅस, सुरण व केळी लागवड, शौचालय बायोगॅस जोडणी, कुक्कुटपालन व्यवसाय यांचा समावेश आहे. प्रकल्पामध्ये नाबार्ड, जिल्हा बँक व भगीरथ प्रतिष्ठान याचा सहभाग आहे. जिल्हा बँकेने हा प्रकल्प मुदतीत पूर्ण केला असून त्याची पाहणी करण्यासाठी जर्मनी येथील केएफडब्लू संस्थेच्या प्रतिनिधींनी या प्रकल्पाला भेट दिली.

युपीएनआरएम प्रकल्पामुळे झालेल्या सकारात्मक परिणामांचा अभ्यास करणेसाठी जर्मनमधून केएफडब्लू या संस्थेच्या मॅनेजर श्रीम. थेरेसा व नाबार्डचे डेप्युटी जनरल मॅनेजर हेमंत कुंभारे यांनी सोमवार १६ जूनला बँकेस भेट दिली. यावेळी या प्रतिनिधींनी निवजे गावातील लाभार्थी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या प्रकल्पात सहभागी झाल्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांना झालेला फायदा, त्यांचा उत्पन्न स्त्रोत, जीवनमानात झालेला बदल इत्यादी बाबत माहिती घेतली. तसेच लाभार्थी शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष गोठ्यात जावून दुभती जनावरे, बायोगॅस, गांडूळ खत प्रकल्प इत्यादींची प्रत्यक्ष पाहणी केली. तद्नंतर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, झाराप कार्यालयास भेट देवून प्रकल्पाबाबत माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयास भेट देवून लाभार्थी शेतकऱ्यांना केलेल्या कर्जवाटपाची माहिती घेतली. या प्रकल्पामुळे झालेला सामाजिक, आर्थिक बदल तसेच बँकेच्या सर्वसामान्य ग्राहकांची झालेली वाढ याची माहिती घेवून समाधान व्यक्त केले.

केएफडब्लू या संस्थेच्या मॅनेजर श्रीम. थेरेसा यांनी जिल्हा बँक व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान झाराप यांनी प्रकल्प चांगल्या प्रकारे राबविला म्हणून विशेष अभिनंदन केले. यावेळी जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे व भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, निवजे गावचे सरपंच, निवजे दुग्ध संस्थेचे अध्यक्ष व निवजे गावचे लाभार्थी शेतकरी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments