संजय दराडे; शांतप्रिय जिल्ह्याची ओळख कायम ठेवणार…
कणकवली, ता.१९: सिंधुदुर्ग जिल्हा हा शांतप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो. अवैध धंदे, अमली पदार्थांची विक्री आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचा विश्वास कोकण परिक्षेत्राचे महानिरीक्षक संजय दराडे यांनी व्यक्त केला. कणकवली पोलीस स्थानकाला गुरुवारी सायंकाळी भेट देऊन त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
संजय दराडे यांनी सांगितले की, सिंधुदुर्ग पोलीस यंत्रणेतील अधिकारी आणि कर्मचारी अनुभवी असून, गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी सदैव तत्पर आहेत. येत्या काळात अवैध धंदे आणि अमली पदार्थांची विक्री पूर्णपणे नियंत्रणात येईल. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहे. “आमच्या अधिकाऱ्यांच्या नजरेतून कोणताही गुन्हेगार सुटणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
जिल्ह्यात अलीकडच्या काळात सायबर क्राईमच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणा विशेष प्रयत्न करीत आहे. दराडे यांनी स्पष्ट केले की, कोणताही गुन्हा घडल्यास त्याचा छडा लावण्याची आणि आरोपींना जेरबंद करण्याची क्षमता पोलीस यंत्रणेत आहे. “जिल्ह्यात कोणताही गुन्हा अंडरटेक राहणार नाही, प्रत्येक गुन्ह्याचा डिटेक्शन होईल,” असे त्यांनी नमूद केले.
कणकवली पोलीस स्थानकाला भेट देण्याच्या वेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अप्पर पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, उपविभागीय पोलीस अधिकारी घन:श्याम आढाव, पोलीस निरीक्षक मारुती जगताप, एलसीबीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर, भरोसा सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक नलिनी शिंदे, पोलीस उपनिरीक्षक अनिल हाडळ, महेश शेडगे यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित होते.