ज्ञानेश्वर म्हात्रेंचा इशारा; आगामी पावसाळी अधिवेशनात कारवाईसाठी प्रयत्न करणार…
सिंधुदुर्गनगरी,ता.१९: जिल्ह्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे होत नसतील, संघटना विश्वासात घेऊन प्रश्न सोडवले जात नसतील तर आम्हाला हा शिक्षणाधिकारी नकोच, अशी भूमिका शिक्षक परिषदेचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी आज येथे मांडली. दरम्यान आगामी काळात होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात हे प्रश्न मांडून संबंधितावर कारवाई करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्ह्यातील मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सहविचार सभा संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष वामन तर्फे, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष भरत केसरकर, कोकण कार्याध्यक्ष सलीम तकिलदार, सचिव नंदन घोगळे, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष संजय वेतुरेकर, मराठा शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिनेश म्हाडगुत, अध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अजय शिंदे, सचिव विजय मयेकर, प्रयोगशाळा सहाय्यक शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र काळे, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम,शिवछत्रपती शिक्षक संघटनेचे जिल्हासचिव सुभाष खरात,कोल्हापूर विभाग शिक्षकेतर संघटनेचे सचिव गजानन नानचे,शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुरेंद्र लांबोरे,शिक्षक पतपेढीचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र लांबोरे,मुख्याध्यापक संघाचे सचिव राजेंद्र घावरे,जुनी पेशंन राज्याध्यक्ष चोडणकर सर,संस्थाचालक संघटनेचे जी.ए.सामंत,गुरुदास कुसगावकर आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.