सावंतवाडी,ता.२१ : येथील सद्गुरु मियांसाब यांचा ८० वा पुण्यतिथी उत्सव आज भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. यावेळी अनेक हिंदू-मुस्लिम धर्मियांनी त्यांच्या समाधीस्थळी येवून दर्शन घेतले. पूर्वीचे सावंतवाडी संस्थान अर्थात बांदा येथील रहिवासी मुसलमानी धर्म पंथांतील सद्गुरु घराणे होते. या घराण्यात हे महासंत उदयास आले. मुसलमान धर्माचे संस्थापक महंमद पैगंबर यांचे नाव त्यांना ठेवण्यात आले. बांधकाम विभागात अधिकारी असणाऱ्या मियांसाब यांचे शिर्डीच्या साईबाबांच्या समाधी बांधकामात मोठे योगदान होते.
महंमद अबदुल्ला सद्गुरु अर्थात सद्गुरू मियांसाब यांचा योगी एकादशी दिवशी पुण्यतिथी सोहळा साजरा केला जातो. सीताराम महाराज यांचे ते शिष्य असून सावंतवाडी व कोलगाव येथील स्थानिकांचा व व्यापारी वर्गाचा या कार्यक्रमात मोठा वाटा असतो. मियांसाब यांच्या समाधीवर चादर चढवून नवस फेडले जातात. यावर्षी ८० व्या पुण्यतिथीला जिल्हाभरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सकाळपासूनच सदगुरू पूजन, नामस्मरण, कीर्तन, ज्ञानेश्वरी, एकनाथ भागवत वाचन हरिपाठ, आरती अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी महाप्रसाद पार पडला. जिल्ह्यासह गोवा, कर्नाटक येथील भाविकदेखील पुण्यतिथीनिमित्त समाधीवर चादर अर्पण करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी वसंत राणे, सतीश शिरोडकर, दत्तप्रसाद अरविंदेकर, शैलैश पई, उमेश कोरगावकर, श्री. सावंत, श्री. मसुरकर यांसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.