दीपक केसरकर; येणाऱ्या निवडणुकीत रावणाच्या तिन्ही तोंडाचा वध करा…
सावंतवाडी, ता. १६ : मला संपविण्याची भाषा करणारे स्वतःच संपले आणि त्यांचा पक्ष सुध्दा विसर्जित करावा लागला.आता येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा रावणाच्या तिन्ही तोंडाचा वध करा,अशी टीका शिवसेनेचे उमेदवार तथा पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे आयोजित मेळाव्यात केली.जिल्ह्यातून हद्दपार झालेली प्रवृत्ती पुन्हा एकदा मागच्या दाराने येऊ पाहत आहे.मात्र येथील जनता त्यांना कदापी स्वीकारणार नाही,आणि पुन्हा एकदा माझ्या पाठीशी उभी राहील,असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई,खासदार विनायक राऊत,आमदार वैभव नाईक,अरुण दुधवडकर,संजय पडते,संदेश पारकर,माजी आमदार शिवराम कांबळी,संजय राऊत,जानवी सावंत,विक्रांत सावंत,अनारोजिन लोबो आदी उपस्थित होते.
श्री.केसरकार पुढे म्हणाले,सिंधुदुर्ग जिल्ह्यात दहशतवाद निर्माण करणाऱ्या रावणाची चार तोंडे उडविण्यात शिवसेनेला यश आले आहे.आता येत्या विधानसभेत पुन्हां एकदा तीन तोंडे येऊ पाहतायेत,मात्र तीनही विधानसभा मतदारसंघात उभी असलेली तीन तोंडे शिवसैनिक नक्कीच उडवतील असा विश्वासही त्यांनी कोणाचेही नाव न घेता व्यक्त केला.
ते पुढे म्हणाले,मी राष्ट्रवादीत असताना राणेंच्या मुलाचा प्रचार करण्याची वेळ माझ्यावर येत होती.मात्र माझा लढा हा दहशतवादी प्रवृत्ती विरोधात होता.आणि ती वेळ टाळण्यासाठी मी माझ्या आमदारकीचा राजीनामा देत शिवसेना पक्षात प्रवेश केला.याला स्वाभिमान म्हणतात,मात्र याउलट आज तकायत राणें आपला स्वाभिमान गहाणच टाकत आले आहेत.त्यामुळेच त्यांना आपला स्वाभिमान पक्ष भाजपाच विसर्जित करावा लागला,अशी खिल्लीही श्री.केसरकर यांनी उडवली.
ते पुढे म्हणाले,मी आज तकायत दिलेला लढा हा दहशतवादाशी आणि राणे प्रवृत्तीशी होता.आणि हा लढा सर करण्यास मला यश आले आहे.जी प्रवृत्ती जनतेला नको होती ती मी शिवसेनेच्या माध्यमातून नष्ट केली.आणि सिंधुदुर्गसीयांची अपेक्षा पूर्ण केली.जिल्ह्यात शांतता असलेल तरच जिल्ह्याचा विकास साधता येतो.आणि तो मी साधला आहे.त्यामुळे पुन्हा एकदा मागच्या दाराने येऊ पाहणाऱ्या या प्रवृत्तीला जनता मागच्या दाराने परत पाठवेल.त्यासाठी जनता माझ्या पाठीशी नक्कीच उभी राहील, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.