पर्यावरण प्रेमींचा पुढाकार; १२ गावांतून जाणाऱ्या महामार्गाला तीव्र विरोध…
सावंतवाडी, ता.२७: नागपूर ते पत्रादेवी असा जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामस्थ, शेतकरी, सामाजिक कार्यकर्ते आणि पर्यावरण प्रेमींकडून तीव्र विरोध होत आहे. या विरोधाला एकजुटीने वाट करून देण्यासाठी बुधवार ता. २ जुलैला सायंकाळी ५.३० वाजता सावंतवाडी येथील काझी शहाबुद्दीन हॉल येथे शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीने एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले आहे.
या संदर्भात आपली भूमिका मांडण्यासाठी सर्व पर्यावरण प्रेमी, शेतकरी, ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी, काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जिल्हाध्यक्ष अमित सामंत, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीचे निमंत्रक डॉ. जयेंद्र परुळेकर, सह-निमंत्रक सतीश लळीत, वैश्य समाज सावंतवाडीचे अध्यक्ष प्रसाद पावसकर आणि असनिये येथील संदीप सावंत यांनी केले आहे. ग्रामस्थांच्या मागणीशिवाय आणि गरजेविना लादण्यात येत असलेला हा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १२ संवेदनशील गावांतून जाणार आहे. यामध्ये गेळे, आंबोली, पारपोली, नेनेवाडी, घारपी, फुकेरी, असनिये, तांबोळी, झोळंबे, डेगवे आणि बांदा या गावांचा समावेश आहे. हा महामार्ग जिल्ह्यातील जैवविविधता आणि निसर्ग उद्ध्वस्त करेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याचा आणि शेती-बागायतीसाठी लागणाऱ्या पाण्याचा गंभीर प्रश्न यामुळे निर्माण होईल, असे समितीचे म्हणणे आहे. प्रस्तावित महामार्गामुळे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या जंगलातील लाखो वृक्षांची कत्तल होणार आहे. सह्याद्रीतील ही प्रचंड वृक्षतोड केवळ पर्यावरणासाठीच नव्हे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांसाठीही धोकादायक ठरू शकते. हा संपूर्ण परिसर वन्यजीवनाने समृद्ध असून वाघांचा संचारमार्ग याच भागातून जातो. त्यामुळे या प्रकल्पाचा वन्यजीवांवरही विपरीत परिणाम होईल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
“शक्तीपीठ महामार्गाला विरोध मोडून काढू” आणि “विरोध करणाऱ्यांना फटके मारू” अशा उद्दाम प्रवृत्तींना शांततेच्या आणि लोकशाही मार्गाने विरोध दर्शवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. राज्यातील बाराही जिल्ह्यांमध्ये या महामार्गाला मोठ्या प्रमाणात विरोध होत असून सर्व ठिकाणी शेतकरी आणि नागरिक आक्रमकपणे परंतु सनदशीर मार्गाने या प्रकल्पाला विरोध करत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही अशा प्रकारचे आंदोलन उभे राहणे आवश्यक असल्याचे समितीने म्हटले आहे. याबाबतचे प्रसिद्धी पत्र या समितीचे निमंत्रक डॉ. जयेंद्र परूळेकर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.