आंबोली, सांगेली बचाव पथकाला अद्ययावत साधने; आपत्कालीन परिस्थितीत फायदा होणार…
आंबोली, ता.२९: सह्याद्रीच्या दुर्गम खोऱ्यात आपत्कालीन सेवेत महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या आंबोली व सांगेली बचाव पथकाला आवश्यक साधने देऊन पालकमंत्री नितेश राणे व आमदार दीपक केसरकर यांनी चांगली भूमिका घेतली आहे. या मदतीबद्दल आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यांचे आभार मानत आहोत, अशी भूमिका आंबोली सरपंच सौ. सावित्री पालेकर यांनी मांडली आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून राणे व केसरकर यांचे कौतुक केले आहे. आंबोली आणि सांगेली या ॲडव्हेंचर रेस्क्यू ग्रुप अनेक वेळा घाटात घडणाऱ्या अपघातामध्ये महत्त्वाचे योगदान घेवून त्या ठिकाणी निस्वार्थपणे सहकार्य करतो. त्यामुळे त्यांच्या या भूमिकेबद्दल आम्ही आभारी आहोत. त्यामुळे संबंधित दोन्ही ॲडव्हेंचर्स ग्रुपला आवश्यक साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही प्रशासन व दोन्ही लोकप्रतिनिधींचे आभार मानतो, असे पालेकर यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
सौ. पालेकर म्हणाले की, हे शोध व बचाव साहित्य येत्या काळात या टीमला आणि प्रशासनाला खूप सहकार्य करणार आहे. एखाद्या शोध आणि बचाव टीमला एवढ्या मोठ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध करून देण्याची ही कदाचित पहिलीच घटना असावी असेही त्या म्हणाल्या. त्यामुळे हे साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केलेल्या दीपक केसरकर, नितेश राणे आणि महायुती सरकारचे त्यांनी आभार मानले आहेत.