एम.के.गावडे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून येणार
वेंगुर्ले : ता.१७
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली येथे प्रचार सभा घेऊन आपल्या जाहीर नाम्यांमध्ये तसेच वचनाम्यांध्ये दिलेली आश्वासने यावर काहीच न बोलता केवळ वैयक्तिक पातळीवर टीका करण्याचे काम केले आहे. यावरून त्यांना सामान्य जनतेच्या प्रश्नांबाबत काहीच देणे-घेणे नसल्याचे दिसून आले आहे. या सरकारने जनतेसमोर कोणतेही व्हिजन न ठेवल्याने या सरकारला कंटाळलेली जनता यावेळी परिवर्तन घडवून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून देतील. त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार प्रचंड मतांनी विजयी होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रांतिक सदस्य एम. के. गावडे यांनी व्यक्त केला.
अतिवृष्टीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे आंबा पिकाचे पण नुकसान झाले आहे. काही शेतकऱ्यांना आंबा पीक नुकसानीच्या विम्याचा लाभ मिळाला नाही. त्याचप्रमाणे काजू उत्पादनावरील आयात शुल्क कमी केल्याने काजू-बीच्या दरात घट निर्माण झाल्याने काजू उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास झाला नाही. येथे लाभलेली मोठी सागर किनारपट्टी पाहता समुद्र पर्यटन प्रकल्प झाले नाहीत. महामार्गापासून समुद्र किनारी जाणाऱ्या भोगवे, मालवण, कुणकेश्वर, निवती, सागरेश्वर समुद्र किनारी जाणाऱ्या रस्त्यांची फारच दुरावस्था झाल्याने पर्यटक तेथे जाण्यास नापसंती दर्शवित आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन विकासाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होऊ शकली असती मात्र पर्यटन विकासाकडे दुर्लक्ष केल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा पर्यटन विकास झाला नाही. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणाच व्हेंटिलेटरवर असल्याने येथील रुग्णांना उपचारासाठी गोवा बांबोळी येथे जावे लागते या सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांवर या युती सरकारच्या नेत्यांनी काहीच भाष्य केले नाही. तसेच
येथील पालकमंत्री जिल्ह्याच्या विकासात पूर्णपणे निष्क्रिय ठरले आहेत. त्यामुळे यावेळी विधानसभा निवडणुकांमध्ये सामान्य जनता ही परिवर्तन घडविल्याशिवाय राहणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तिन्ही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार विजयी होतील, असेही गावडे यांनी सांगितले.