तरुणाईला बळकटी मिळणार; भाजपकडून मोठी जबाबदारी दिली जाण्याची चर्चा…
सावंतवाडी/अमोल टेंबकर, ता.३०: युवा नेते आणि उद्योजक विशाल परब हे पुन्हा एकदा राजकारणात सक्रिय होणार आहेत. त्यांच्या खांद्यावर भाजपच्या माध्यमातून मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावल्यानंतर गेले काही दिवस ते अज्ञातवासात होते. मात्र आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांच्याकडे सावंतवाडी मतदारसंघाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे.
भाजप युवा मोर्चाच्या माध्यमातून प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम केलेल्या विशाल परब यांनी अवघ्या काही वर्षात सावंतवाडी विधानसभा मतदार संघासोबत अवघ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात दमदार कामगिरी केली होती. त्यामुळे त्यांना मानणारा तरुणांचा एक मोठा वर्ग आहे. त्यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला आपलेसे करण्याची अनोखी स्टाईल हे सगळे गुण लक्षात घेता ते कोणत्याही पक्षात आपले नशीब आजमावू शकतात. त्यामुळे त्यांची ताकद लक्षात घेता त्यांना पुन्हा एकदा भाजपात मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. आगामी काळात होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा प्रवेश घेऊन त्यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्यात येणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून समजते.
श्री. परब हे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या कायम उजवे राहिले आहेत. त्यांनी आपल्या पुढाकारातून तसेच खिशात हात घालून शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रम राबवले. त्यामुळे ते अनेक तरुणांना लक्षात राहिले. कोरोना काळात त्यांचे मोठे योगदान होते. राजकीय क्षेत्रात सुद्धा त्यांनी चांगली भरारी घेतली होती. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात राहून सुद्धा त्यांनी ३३ हजार मते घेतली होती. त्यामुळे त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे त्यांची ताकद आता भाजप पुन्हा एकदा वापरणार आहे. तूर्तास सावंतवाडी मतदार संघाची परिस्थिती लक्षात घेता या ठिकाणी असलेले माजी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राजन तेली यांनी शिवसेनेत प्रवेश केला तर दुसरीकडे माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश सारंग हे दोन चेहरे वगळता तितकासा प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा भाजपात सामावून घेतले जाणार आहे. दुसरीकडे ते शिवसेनेत जातील, अशी चर्चा आहे. परंतु एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता माजी राज्यमंत्री आणि भावी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी असलेले जवळचे संबंध लक्षात घेऊन त्यांना भाजपमध्येच मोठेपण मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आता नेमके त्यांना कोणते पद मिळते?, ते कोणत्या पक्षात जातात? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.