दिंड्या, पालखी आणि विठ्ठल-रखुमाईच्या जयघोषाने परिसर भक्तिमय…
सावंतवाडी,ता.०५: आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला सावंतवाडी येथील संस्थानकालीन श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात शाळकरी चिमुकल्यांनी एक अनोखी “मांदियाळी” भरवत भक्तिमय वातावरण निर्माण केले. विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी विठ्ठल आणि रखुमाईच्या वेशभूषा करून दिंडी व पालखी सोहळ्यात सहभाग घेतला ज्यामुळे मंदिर परिसर विठ्ठल नामाच्या गजराने दुमदुमून निघाला. या सोहळ्यात माठेवाडा अंगणवाडीच्या तीन वर्षांच्या चिमुकल्या बालकांचाही सहभाग होता ज्यामुळे या कार्यक्रमाला विशेष रंगत आली. शहरातील चारही दिशांमधील प्राथमिक शाळांचे विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या विठ्ठल दिंडीत सहभागी झाले होते.
लहान मुलींनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेतले होते तर लहान मुले वारकऱ्यांच्या वेशात डोपी आणि हातात भगवा ध्वज घेऊन आपल्या शाळेतून पालखीसोबत सकाळीच सावंतवाडीच्या विठ्ठल मंदिरात दाखल झाले. अंगणवाडी क्रमांक १५ मधील समर्थ काष्टे याने विठोबाची आणि जीविका कदम हिने रखुमाईची वेशभूषा केली होती. जी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. या दिंडीमध्ये माठेवाडा अंगणवाडी क्रमांक १५ सह सुधाताई वामनराव कामत प्राथमिक शाळेतील विद्यार्थीही सहभागी झाले होते. विठ्ठल रखुमाईच्या वेशात आणि विठ्ठल नामाच्या गजरात विद्यार्थी, पालक आणि शिक्षक विठ्ठल मंदिरात दाखल झाले. कळसुलकर इंग्लिश स्कूल आणि अटल प्रतिष्ठानमधील विद्यार्थ्यांनीही शिक्षकांनी धरलेल्या गोल रिंगणात ठेका धरला. “पांडुरंग विठ्ठला, हरी ओम विठ्ठला” च्या जयघोषाने संपूर्ण वातावरण भारून गेले होते. या उपक्रमात माठेवाडा सुधाताई वामनराव कामत प्रशालेच्या मुख्याध्यापिका भक्ती फाले, शिक्षिका प्राची ढवळ, हेमांगी जाधव, पूजा ठाकूर, भावना गावडे, रंजीत सावंत, अंगणवाडी सेविका अनुराधा पवार, मदतनीस अमिषा सासोलकर आणि पालक सौ. नेहा काष्टे, पूजा गावडे, शिवानी तूयेकर, जान्हवी गावडे, आर्या मुंज, तेजस्विनी चव्हाण, स्वानंदी नेवगी, सानिका मातोंडकर, सौ. नाईक, खुशी पवार आदी सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी विठ्ठल नामाचा गजर करणारी भक्तिगीते गायली, ज्यात निर्वी मडव हिचाही सहभाग होता. या आषाढी वारीमध्ये गीतांश मुंज, सावी नेवगी, गंधार नाईक, युवराज चव्हाण, कबीर परब, रुद्र मिसाळ, दूर्वा गावडे, अथांग मातोंडकर, सार्थक नेवगी, बिहान मडगावकर, अलिशा दापले यांसारख्या अनेक चिमुकल्यांचा सहभाग उल्लेखनीय होता.