स्वतः घेतल्या जाणून अडचणी; जास्तीत- जास्त प्रश्न सोडवण्याचे आश्वासन…
सिंधुदुर्गनगरी, ता.०५: सामान्य जनतेचे प्रश्न त्वरित सोडवण्यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून आज घेण्यात आलेल्या पालकमंत्री कक्षात पीक नुकसान भरपाई, विजेच्या समस्या, साकव पुलांची मागणी, तांडा वस्ती सुधार योजनेतील कामे, वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त पदांची भरती, रुग्णवाहिका चालकांच्या अडचणी आदी विषयावर जिल्ह्यातील नागरिकांनी आपली गाऱ्हाणी मांडली.
यावेळी जास्तीत-जास्त प्रश्न लवकरात- लवकर सोडवले जातील त्यासाठी प्रशासनाने तात्काळ योग्य ती दखल घ्यावी, अशा सूचना वजा आदेश श्री. राणे यांनी प्रशासनाला दिले. खुद्द पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकारातून जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या “पालकमंत्री कक्षात” आज विविध क्षेत्रांतील नागरिकांनी आपल्या स्थानिक समस्या आणि अडचणींबाबत निवेदने सादर केली. पालकमंत्री राणे यांनी यावेळी स्वतः नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांचे समाधान केले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांनी सादर केलेल्या तक्रारी, निवेदने आणि समस्यांवर पालकमंत्री राणे यांनी वैयक्तिक लक्ष दिले. यावेळी राणे यांनी प्रत्येक निवेदनावर संबंधित नागरिकांशी सविस्तर चर्चा केली आणि त्यांचे म्हणणे जाणून घेतले. जिल्हयातील अनेक नागरिक वैयक्तिक समस्या घेऊन आले होते. पालकमंत्री राणे यांनी नागरिकांनी सादर केलेल्या संबंधित निवेदनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनातील अधिकाऱ्यांना दिले. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.