कणकवली, ता.०५: शहर आणि परिसरात आज दिवसभर वादळी वारे आणि पाऊस होत होता. त्यामुळे ठिकठिकाणी झाडे, फांद्या पडून नुकसान झाले आहे.
शहरातील चौंडेश्वरी मंदिर नजीक असलेल्या नयन सुतार यांच्या घरावर झाडाची मोठी फांदी पडल्याने सिमेंटचे पत्रे फुटून नुकसान झाले. तसेच घराच्या बाहेर लावलेल्या दुचाकीचेही नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. याखेरीज कलमठ बिडयेवाडी येथे मोठी आंब्याची फांदी पार्किंग केलेल्या तीन कार वर कोसळली. यात सुदैवाने जीवित हानी टळली मात्र कारचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेनंतर कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री आदींनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य केले.