गाडया जाळण्याची संस्कृती राणेंचीच

2

सतीश सावंत : अ‍ॅड.सावंत, मेघा गांगण यांच्या गाड्या कुणी जाळल्या याचा खुलासा जठारांनी करावा

कणकवली, ता.१९: सर्वसामान्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या गाड्या जाळण्याची संस्कृती ही राणेंचीच आहे. आता हेच राणे भाजपच्या घरात आल्याने भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांची मती गुंग झालीय. ते आम्हाला दहशतवादी ठरवू पाहत आहेत. तसं असेल तर कणकवलीतील अ‍ॅड.उमेश सावंत, नगरसेविका मेघा गांगण यांच्या गाड्या कुणी जाळल्या याचाही खुलासा श्री.जठार यांनी करावा अशी टीका सतीश सावंत यांनी आज कणकवलीत केली.
श्री.सावंत म्हणाले, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्या बोलण्यावर किती विश्‍वास ठेवावा हे कणकवली मतदारसंघातील जनतेला पूर्ण माहिती आहे. श्री.जठार हे माझ्यावर जेवढी टीका करतील तेवढी माझी मते वाढणार आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्यावर खुशाल टीका करावी.
श्री.सावंत म्हणाले, प्रचार सभांत राणेंकडून मात्री पात्रता काढली जातेय. खरं तर माझी पात्रता होती म्हणूनच त्यांनी मला एवढी पदं दिली हे ते सोईस्कर पणे विसरत आहेत. एवढंच नव्हे तर माझ्या कणकवली मतदारसंघात आमच्या ताकदीचा एवढा धसका त्यांनी घेतलांय की संपूर्ण राणे कुटुंबालाच प्रचारात उतरण्याची वेळ आली आहे. राष्ट्रवादीमधून मोठमोठी दिग्गज मंडळी शरद पवार यांना सोडून गेली. पण श्री.पवार यांनी कधीही कुठल्या नेत्या अथवा कार्यकर्त्याची कुवत काढली नाही याचा बोध राणेंनी घ्यावा असही टोला सतीश सावंत यांनी लगावला. तसेच कणकवलीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळणार असा आत्मविश्‍वासही व्यक्त केला.

6

4