पावसाच्या हजेरीने तारांबळ ;काही ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड….
वेंगुर्ले ता.२१:
विधानसभा निवडणुकीसाठी तालुक्यात आज सरासरी ६१ टक्के मतदान झाले.दरम्यान दोन ते चार ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याने काही काळ मतदान प्रक्रिया ठप्प झाल्याची घटना घडली.मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.सायंकाळच्या सत्रात पावसाने हजेरी लावल्यामुळे मतदारांची तारांबळ उडाल्याचे चित्र होते.
वेंगुर्ले तालुक्यातील ९३ मतदान केंद्रांवर सकाळी ७ पासून मतदानाला सुरुवात झाली. तालुक्यात सध्या अधुनमधून पडत असलेला जोरदार पाऊस त्यातच पावसामुळे भातशेतीची खोळंबलेली कामे याचा परिणाम मतदानाच्या टक्केवारीत दिसून आला. दुपारी ३ वाजेपर्यंत सुरळीत सुरु असलेल्या मतदान प्रक्रियेत ३ नंतर पावसाने व्यक्तय आणला. अर्धा ते पाऊण तास मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने मतदारांबरोबरच मतदान केंद्रांच्या शंभर मिटर बाहेर लावलेल्या विविध पक्षांच्या बुथावरील कार्यकर्त्यांचीही तारांबळ उडाली. त्यांना शेजारी असलेल्या घरांचा व झाडांचा आसरा घ्यावा लागला. दुपारनंतर सुरु झालेल्या पावसातही मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजाविला. सायंकाळी ५ नंतर मात्र पावसाने विश्रांती घेतल्याने मतदान केंद्रातील साहित्य सावंतवाडी येथे मतमोजणीच्या ठिकाणी नेताना कोणताही व्यत्यय आला नाही. मतदानाची प्रक्रिया कोणताही अनुचित प्रकार न घडता सुरळीत पार पडली.
विधानसभा निवडणूक मतदार यादीतील घोळ मात्र याहीवेळी कायम राहिल्याने मतदान कार्ड असूनही काही मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागले. तर मयत मतदारांची नावे मात्र अद्यापही मतदार यादीतून कमी झाली नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. वेंगुर्ला शाळा नं.२ या मतदान केंद्रावर १० वाजण्याच्या सुमारास मतदान यंत्रात बिघाड झाल्याने सुमारे अर्धा तास मतदानाची प्रक्रिया रखडली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वैभव साबळे यांनी भेट देऊन बिघाड दूर केला. आरवली-सोन्सुरे येथील बूथ ७८ मधील ईव्हीएम मशील मध्ये बिघाड होता. या ठिकाणी ‘कपाट‘ निशाणीचे बटन दाबल्यास ते मत ‘सिलेंडर‘ या निशाणीला जात होते. येथील मतदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर सदर मतदान मशिन बदलण्यात आली. दरम्यान, या प्रकारामुळे मतदारांची मते फुकट गेल्याचा आरोप व्यक्त करुन मतदारांनी शासकीय कामकाजावर संताप व्यक्त केला, अशी माहिती शिरोडा सरपंच मनोज उगवेकर यांनी दिली.
वेंगुर्ला शहरात ठिकठिकाणी शिवसेना व भाजप पुरस्कृत उमेदवारांचे बूथ लागले होते. या बुथांवर त्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येत होती. मात्र, काँग्रेस-राष्ट्रवादीचे बुथ निदर्शनास आले नाहीत. वेंगुर्ला पोलिस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदशर्नाखाली तालुक्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलिस ठेवण्यात आला होता.