कणकवलीत राणेंचे राजकीय भवितव्य पणाला…..

2

मतमोजणीची चोख व्यवस्था : जिल्हाधिकार्‍यांकडून पाहणी….

कणकवली, ता.23 :
संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कणकवली मतदारसंघाची मतमोजणी उद्या (ता.24) भगवती मंगल कार्यालयात सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. त्याअनुषंगाने निवडणूक प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे. जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे यांनीही मतमोजणी केंद्राची पाहणी केली. कणकवली मतदारसंघात 2 लाख 30 हजार 24 पैकी 1 लाख 49 हजार 984 जणांनी मतदानाचा हक्क बजावला. आता निकालाबाबत उत्सुकता आहे. तसेच या कणकवलीच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
 मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वैशाली राजमाने यांनी मतमोजणी व्यवस्थेचा आढावा घेतला. मतमोजणी 14 टेबलवर होणार असून 24 फेर्‍यानंतर मतमोजणी संपणार आहे. सकाळी 8 वाजता टपाली मतदानाची मोजणी होईल. त्यानंतर इव्हीएम मशिनमधील मतमोजणी सुरू होणार आहे. मतमोजणीवेळी प्रत्येक उमेदवाराचा एक प्रतिनिधी प्रत्येक टेबलासमोर असेल. तर चार कर्मचारी नेमण्यात आले आहेत. याखेरीज भगवती मंगल कार्यालयाच्या बाहेर पोलिसांनी सुरक्षितता ठेवलेली आहे. दुपारी बारापर्यंत मतमोजणी आणि निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.
अशी आहे राजकीय कार्यकर्त्यांची व्यवस्था
मतमोजणीवेळी येणार्‍या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था ठेवण्यात आली आहे. यात मराठा मंडळसमोरील मोकळ्या जागेत भाजप कार्यकर्त्यांची व्यवस्था असेल. तर गोपुरी आश्रमाजवळ शिवसेना कार्यकर्त्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांची व्यवस्था पंचायत समिती कार्यालयासमोर करण्यात आली आहे.

1

4