कुणाला हरवल्याचा नाहीतर आम्ही जिंकल्याचा आनंद राहील : नारायण राणे…

89
2
Google search engine
Google search engine
Google search engine

कणकवली,ता.२३: निकालाची उत्सुकता आहे, आमची खात्री आहे की उद्याचा निकाल नितेश राणे यांच्या बाजूनेच लागेल. मी प्रतिस्पर्धी कोण आहे याचा विचार कधी करत नाही. आम्ही निवडणूक लढवली ती आमच्या उमेदवाराच्या कार्यकर्तृत्वाच्या बळावर. स्थानिक जनता नितेश राणे यांनी केलेल्या कामांवर खुश असल्याने, समोर कोणीही जरी असला तरी आमचा विजय निश्चितच आहे. आम्हाला कुणाला हरवल्याचा आनंद नाही, तर आमचा विजय झाल्याचा आनंद आहे, असा विश्वास नारायण राणे यांनी विधानसभा निवडणूक निकालाच्या पुर्वसंधेला व्यक्त केला आहे. तसेच, त्यांनी यावेळी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेचा समाचार घेत त्यांच्यावर जोरादार टीका देखील केली आहे. मी शिवसेना वाढीसाठी त्याग केला आहे तर उद्धव हे आयत्या बिळावर नागोबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.

यावेळी नारायण राणे म्हणाले की, मला शिवसेना कधीच प्रतिस्पर्धी वाटली नाही, कधी वाटतही नाही आणि यापुढे देखील वाटणार नाही. त्यांच नाव घेण्यासारख काहीच शिल्लक नसल्याने मला त्याचं नाव घ्याव वाटत नाही. त्यामुळेच मी नाव घेण्याचं टाळतो आहे. राणे पितापुत्र शांत होण्याचा प्रश्नच येत नाही. आक्रमकता बरोबरीच्याला दाखवली जाते. जे आमच्या हवेला देखील उभे राहत नाहीत, त्यांच्याशी काय आक्रमकता करायची? आम्ही साधं वागलो तरी त्यांना आक्रमक वाटतो. म्हणूनच पोलिसांकडून संरक्षण मागितले जाते. यावरूनच कळतं की ते किती घाबरतात, त्यामुळे आक्रमक माणसाला आक्रमकता दाखवायची आवश्यकता नसते, ती त्याच्या रक्तातच असते.

उद्धव ठाकरेंनी केलेली टीका ही मलाच काय, जनतेला देखील पटलेली नाही. शिवसेनेत मी ३९ वर्षे होतो, त्यांना शिवसेनेत कार्यरत झाल्यापासून किती वर्षे झाली? हे मला माहिती नाही. मी शिवसेना वाढवण्यासाठी मदत केली, प्रयत्न केले व माझा त्यागही आहे. त्यामुळे मी शिवसेनेचे नुकसान केलेले नाही, उलट शिवसेना वाढवण्यासाठी सर्वकाही केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यामुळेच उद्धव यांनी केलेलं विधान कुणालाच पटणार नाही. काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर मी निवडणुकीत मुख्य प्रचार प्रमुख होतो. जी कामं पक्षाने सांगितली ती मी पार पाडली आहेत. त्यामुळे त्यांचही काही नुकसान झालं नाही. उलट मी जाण्याने दोन्ही पक्षांच नुकसान झालं आहे. त्यामुळे माझ्यावर होणारी टीका ही जळफळाट आहे. कोकणासाठी उद्धव ठाकरेंचे काय योगदान आहे? हे त्यांनी सांगावे. कोकणात येऊन कोकणी माणसावर तेही नारायण राणेवर टीका केलेली, इथल्या कोकणी माणसाला आवडलेली नाही.

\