वैभव नाईक ; मतदारांचे मानले आभार…
कुडाळ, ता. २४ : कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघात धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा सामना झाला. यात जनशक्तीचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे विजयी उमेदवार आम. वैभव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विजय निश्चित झाल्यानंतर मतमोजणी केंद्रातून बाहेर येताच आम. नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत महिला जिल्हा आघाडी प्रमुख जान्हवी सावंत व अन्य पदाधिकारी उपस्थित होते. आम. नाईक यांनी प्रथम शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर कुडाळ-मालवणमधील मतदारांचे आभार मानले.
आम. नाईक यांनी भाजपने या निवडणुकीत अत्यंत चुकीचा पायंडा पाडला. त्यांनी केंद्रीय मंत्री तसेच राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याठिकाणी घेतलेल्या प्रचार सभांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. युतीचा उमेदवार असतानाही माझ्या विरोधात भाजपने प्रभावी काम केले. तरीही जनतेने मला स्वीकारले. यापुढे जनतेला अपेक्षित काम करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.
प्रचारा दरम्यान मंत्री पदासाठी मते मागितली गेली. तसेच २५ हजाराहून मताधिक्य मिळेल असे सांगितले जात होते. मात्र प्रत्यक्षात अपेक्षित मताधिक्य मिळाले नाही याबाबत विचारले असता आम. नाईक यांनी शेवटच्या काही दिवसात धनशक्तीचा वापर जोरदार केला गेल्यामुळे माझ्या मताधिक्यात घट झाल्याचे स्पष्ट केले.