समुद्री उधाणाचा किनारपट्टीस जबरदस्त तडाखा…

123
2
Google search engine
Google search engine
Google search engine

सिंधुदुर्ग किल्ल्यासह मेढा-राजकोट, जामडूल बेट, देवबाग वस्तीत पाणी घुसले : किनारपट्टीत सर्वत्र घबराटीचे वातावरण…

मालवण, ता. २५ : अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्यामुळे निर्माण झालेल्या चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा सिंधुदुर्गच्या किनारपट्टी भागास बसला आहे. आज पहाटेपासून उधाणाच्या लाटांचे पाणी सिंधुदुर्ग किल्ल्यासह, मेढा राजकोट, आचर्‍यातील जामडूल बेट, देवबाग येथील वस्तीत घुसले. शहरातील बंदर जेटी, मोरेश्‍वरवाडी, दांडी, तळाशील, तारकर्ली किनारपट्टी भागालाही उधाणाचा फटका बसला आहे. काही मच्छीमारांच्या होड्या उधाणाच्या तडाख्यात वाहून गेल्या आहेत. सोसाट्याच्या वार्‍यासह मुसळधार पावसाचा जोर वाढल्याने किनारपट्टी भागात घबराट पसरली आहे.
समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वादळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात गेले काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. आज पहाटे समुद्राला आलेल्या उधाणाचे पाणी सिंधुदुर्ग किल्ल्यात, मेढा राजकोट, देवबाग, जामडूल बेटावरील वस्तीत घुसले. समुद्री उधाणाचे पाणी किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत घुसून हनुमान मंदिरपर्यत पोचले आहे. अजस्र लाटांचा मारा तटबंदीस होत आहे. त्यामुळे किल्ला रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. शहरातील मेढा राजकोट येथील किनार्‍यालगत असलेल्या वस्त्यांमध्ये सकाळी उधाणाचे पाणी घुसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. काही मच्छीमारांनी आपल्या नौका दोन दिवसांपूर्वी सुरक्षित ठिकाणी नेल्या होत्या. यात दांडी समुद्रात काहीजणांनी समुद्रात ठेवलेले ट्रॉलर्स व छोट्या नौकांना धोका निर्माण झाल्याचे दिसून आले. यात काही छोट्या होड्या समुद्रात वाहून गेल्याचे दिसले. समुद्राचे अक्राळविक्राळ रुपामुळे किनारपट्टी भागात हाहाकार उडाल्याचे चित्र आहे. मेढा राजकोटमधील मच्छीमारांनी समुद्रातील आपल्या नौका किनार्‍यावर ओढण्यास सुरवात केली आहे. यात काही मच्छीमारांच्या नौका आदळून नुकसानही झाले आहे. वायरी भुतनाथ मोरेश्‍वरवाडीत समुद्री उधाणाचे पाणी घुसले आहे. याची माहिती मिळताच नगरसेवक पंकज सादये, अशोक तोडणकर, गणेश तोडणकर यांच्यासह स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
सकाळच्या सत्रात समुद्री उधाणाचा जोर वाढल्याचे लाटांचे पाणी मासळी मंडईत घुसल्याचे दिसून आले. किनार्‍यालगत लाटांचा जबरदस्त मारा सुरू आहे. दांडी, तळाशील, देवबाग वस्तीपर्यत समुद्री लाटांचे पाणी घुसल्याने सर्वत्र घबराटीचे वातावरण आहे. आचर्‍यातील जामडूल बेट समुद्री उधाणामुळे पाण्याखाली गेल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. दुपारनंतर सोसाट्याच्या वार्‍यासह उधाणाचा जोर वाढणार असल्याने मच्छीमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

\