महान येथे कारवाई ; दोन अल्पवयीन मुलांचा समावेश…
मालवण, ता. २५ : अवैधरीत्या गांजा विक्री व बाळगल्याप्रकरणी मालवण पोलिसांनी धडक कारवाई करताना चार जणांना आज रंगेहाथ पकडले. यात दोन अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. चौघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून संबंधितांविरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तंटामुक्त समिती अध्यक्ष व पोलिस पाटील यांच्या सहकार्याने पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित आरोपी चौके, महान गावातील असल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
तालुक्यात अवैधरीत्या गांजाची विक्री होत असल्याच्या सातत्याने तक्रारी होत होत्या. त्यादृष्टीने पोलिसांनी धडक कारवाईसाठी मोहिम हाती घेतली होती. यात त्यांना आज यश आले. स्थानिक तंटामुक्त समिती अध्यक्ष व पोलिस पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिस निरीक्षक विनीत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी संतोष गलोले, कैलास ढोले, सिद्धेश चिपकर यांच्या पथकाने महान येथे अचानक छापा टाकत चार जणांना रंगेहाथ पकडले. यात त्यांना गांजाची पाच पॅकेट आढळून आली. त्यानुसार त्यांनी समीर सुरेश गावडे रा. चौके, दिवेश शरद गावडे रा. महान यांच्यासह दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. संशयितांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले असून रात्री उशिरापर्यंत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.