नुकसानीची खोटी माहिती देण्याचे टाळावे ; नुकसानग्रस्त किनारपट्टीची पाहणी…
मालवण, ता. २७ : चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात मोठे नुकसान झाले. धोका टळला असला तरी सुर्दैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. वित्तहानी मोठी झाली. यात मच्छीमारांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्तांना पुन्हा कसे उभे करता येईल यासाठी शासन प्रयत्नशील आहे. प्रत्येक मच्छीमार बांधवांना नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी प्रयत्न करू. मात्र मच्छीमारांनी कोणतीही खोटी माहिती खरी माहिती द्यावी जेणेकरून नुकसानग्रस्तांना मदत देताना शासनास अडचणी भासणार नाही याची दक्षता घ्यायला हवी असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी देवबाग येथे स्पष्ट केले.
चक्रीवादळामुळे किनारपट्टी भागात झालेल्या नुकसानीची आज दुपारी जिल्ह्याचे पालकमंत्री केसरकर यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, नितीन वाळके, मंदार केणी, यतीन खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, शीला गिरकर, दीपा शिंदे, अंजना सामंत, विद्या फर्नांडिस, नीलम शिंदे, पूजा तोंडवळकर, नंदा सारंग, पंकज सादये, भाई कासवकर, किरण वाळके, पंचायत समिती सदस्य मधुरा चोपडेकर, मकरंद चोपडेकर, रमेश कद्रेकर, मनोज खोबरेकर, श्री. मेस्त्री, वायरी भुतनाथ, देवबाग सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
वादळाचा धोका आता टळला आहे. मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. काही कर्मचारी दिवाळी सुटीमुळे नाहीत ते दोन दिवसात हजर झाल्यानंतर नुकसानीची सविस्तर आकडेवारी प्राप्त होईल. या नुकसानीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. नुकसानग्रस्तांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची शासनाची भूमिका आहे. या वादळाला तोंड देत असताना नुकसानग्रस्तांना पुन्हा स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातील. वाहून गेलेल्या बंधार्यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देऊ. समुद्राचे पाणी विहीरींमध्ये गेल्याने त्या विहिरी साफ करण्याची कार्यवाही करावी लागेल. यादृष्टीने तत्काळ कार्यवाही केली जाईल असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
वादळाच्या तडाख्यामुळे किनारपट्टी भागातील मच्छीमारांच्या जाळ्या वाहून गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा मच्छीमारांना जाळ्या देणार आहोत. चांदा ते बांदा योजनेतंर्गत जे रापणकर संघ आहेत त्यांना ७५ टक्के अनुदानावर जाळ्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मुसळधार पावसामुळे मासळी सुकविणार्या कट्ट्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याठिकाणी सोलार ड्रायर्स दिले जाणार आहे. याचा वापर झाल्यास अधिक स्वच्छ मासे व चांगला दर मिळेल. या अनुषंगाने मच्छीमारांची बैठक मालवण किंवा देवबाग येथील पर्यटन विकास महामंडळाच्या केंद्रात लवकरच घेतली जाईल. पूरहानीत जसे नुकसान भरून काढले तसेच ते भरून काढले जाईल असे श्री. केसरकर यांनी सांगितले.
एशियन डेव्हलपमेंट बँकेमार्फत ७४० कोटी रुपयांचे बंधारे मंजूर करण्यात आले आहेत. यात देवबाग बंधार्याचा समावेश आहे. हे काम मंजूर झाले असून त्याची निविदा प्रक्रियाही झाली आहे. जिओ ट्यूबचा हा बंधारा हा उत्तम पर्याय आहे. उधाणाच्या तडाख्यात किनारपट्टीलगतचा काही भाग नादुरुस्त झाला आहे. ज्याठिकाणी घरे आहेत आणि तेथे उधाणाचा धोका जास्त आहे अशा ठिकाणी जुन्या संरक्षक बंधार्याची दुरुस्ती करताना मोठे दगड कसे वापरले जातील यादृष्टीकोनातून येत्या काळात प्रयत्न केले जातील असे श्री. केसरकर यांनी स्पष्ट केले.