राधिका लोणे ठरल्या ‘खेळ पैठणी‘च्या मानकरी…

2

वेंगुर्लेतील स्पर्धेत ४० महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

वेंगुर्ले : ता.१
वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे महिलांसाठी आयोजित केलेल्या ‘खेळ पैठणी‘चा या स्पर्धेत राधिका लोणे ही मानाच्या पैठणीची व सोन्याच्या नथीची मानकरी ठरली. या स्पर्धेत एकूण ४० महिलांनी सहभाग घेतला.
वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळातर्फे २९ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत दीपावली शो टाईमचे आयोजन केले होते. शो टाईमच्या समारोपा दिवशी गुरुवारी रात्री महिलांसाठी ‘खेळ पैठणी‘चा ही स्पर्धा घेण्यात आली. विविध खेळांनी उत्तरोत्तर रंगत गेलेल्या या स्पर्धेत राधिका लोणे हिने प्रथम क्रमांक पटकावित पैठणीची मानकरी ठरली. तिला पैठणीसोबत सोन्याची नथही बक्षिस म्हणून देण्यात आली. द्वितीय क्रमांक रिया टेमकर हिने तर तृतीय क्रमांक सोनाली जगताप यांनी पटकाविला. या दोघांना अनुक्रमे मिक्सर आणि फ्राय पॅन सेट बक्षिस म्हणून देण्यात आले. सहभागी झालेल्या ४० ही स्पर्धकांना भेटवस्तू देऊन तसेच स्पर्धकांसाठी ठेवलेला लकी ड्राॅमध्ये अपर्णा सावंत यांना साडी तर प्रेक्षकांसाठी ठेवलेल्या लकी ड्राॅमध्ये दिव्या फोवकांडे यांना मोबाईल फोन देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश नेमळेकर यांनी केले. बक्षिस वितरण प्रसंगी वेंगुर्ला शहर बाजारपेठ मित्रमंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते. स्पर्धेसाठी बक्षिसे पुरस्कृत करुन सहकार्य केल्याबद्दल आयोजकांतर्फे पुरस्कर्त्यांचे आभार मानले.
दरम्यान, ही स्पर्धा सुरु असताना मध्येच पावसाने हजेरी लावली. मात्र, प्रेक्षकांनी आजूबाजूला आश्रय घेत तर काहींनी या पावसातच उभे राहत या स्पर्धेचा आनंद लुटला. त्यानंतर कुडाळ येथील व्हेरीएशन कलामंच प्रस्तुत नृत्य, नाट्य व विनोद या ‘रंगबहार‘ कार्यक्रमाने दिपावली शोटाईम कार्यक्रमाची सांगता झाली.

7

4