Friday, April 18, 2025
Google search engine
Homeकोकणातील ताज्या बातम्या'त्या' दोघांचा मृत्यू तापसरीने नव्हे ; आरोग्य विभागाने केले स्पष्ट...

‘त्या’ दोघांचा मृत्यू तापसरीने नव्हे ; आरोग्य विभागाने केले स्पष्ट…

साथरोगाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या ; हलगर्जीपणा खपवून घेणार नाही- राजेंद्र पराडकर…

मालवण, ता. १ :

तालुक्यात जे दोन रुग्ण दगावले ते तापसरीने नव्हे तर बांदिवडे येथील परिक्षित आसोलकर याचा मृत्यू ब्रेन ट्यूमरने तर कांदळगाव येथील सुभाष वायंगणकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी यांनी साथरोग सर्व्हेक्षण आढावा बैठकीत स्पष्ट केले.
दरम्यान तापसरी साथीच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्य विभागाच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी सतर्क राहावे यात हेळसांडपणा होता नये याची काळजी घ्यावी. जे कर्मचारी हलगर्जीपणा करतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी स्पष्ट केले.
मालवण पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात आज दुपारी साथरोग सर्व्हेक्षणांतर्गत आढावा बैठक पार पडली. बैठकीस सभापती सोनाली कोदे, उपसभापती अशोक बागवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर, सहायक गटविकास अधिकारी श्याम चव्हाण, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कौमुदी रसाळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कुबेर मिठारी, आचरा वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. बी. जाधव, हिवाळे वैद्यकीय अधिकारी डॉ. रवींद्र सावंत, मसुरे वैद्यकीय अधिकारी डॉ. दीप्ती रेडेकर, गोळवण वैद्यकीय अधिकारी डॉ. स्नेहल टिंगरे यांच्यासह आरोग्य सहायक, सहायिका, मुख्यसेविका उपस्थित होत्या.
तालुक्यात दोघांचा तापसरीने मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र वैद्यकीय अहवालानुसार बांदिवडेतील परिक्षित आसोलकर या शाळकरी मुलाचा मृत्यू हा ब्रेन ट्यूमरमुळे झाला तर कांदळगाव येथील सुभाष वायंगणकर यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे. यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त राहिल्याने जलजन्य, किटकजन्य आजारांचे प्रमाण वाढले आहे. तापसरीने रुग्ण दगावल्याच्या माहितीने सर्वसामान्यांमध्ये भीती पसरली आहे. तालुक्यात तापसरीचे रुग्ण आढळून आले नसले तरी आरोग्य विभागाच्यावतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. साथरोगाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचार्‍यांनी सतर्क राहावे. ज्या वाडीत रुग्ण आढळून येतील त्या वाडीला भेट देत आवश्यक त्या उपाययोजना तत्काळ राबवाव्यात. शिक्षण विभागाबरोबरच अंगणवाडीतील मुलांना ताप आला असल्यास त्याची माहिती तत्काळ लगतच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात द्यावी. जानेवारी महिन्यापासून तालुक्यात लेप्टोचे १० रुग्ण, मलेरियाचे ३ रुग्ण तर डेंगीचा एक रुग्ण आढळून आला. या सर्व रुग्णांवर उपचार करून त्यांना बरे करण्यात आले आहे. तालुक्यात साथरोगाने एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही असेही डॉ. मिठारी यांनी स्पष्ट केले.
तालुक्यात तापसरी उद्भवू नये यासाठी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. तालुक्यातील जी जोखीमग्रस्त गावे आहेत त्यावर अधिक लक्ष केंद्रित करावे. खासगी रुग्णसेवा देणार्‍या डॉक्टरांकडून तापाच्या रुग्णांची माहिती वेळच्यावेळी उपलब्ध करून घ्यावी जेणेकरून आवश्यक त्या उपाययोजना तातडीने करता येतील. सध्या भातकापणीचा हंगाम असल्याने डिसेंबर अखेरपर्यंत खबरदारी घ्यावी लागणार आहे. जे कर्मचारी कामात हलगर्जीपणा करत आहेत त्याची माहिती आपल्याला द्यावी. जीवन आरोग्याचा हा प्रश्‍न असल्याने कोणताही हलगर्जीपणा खपवून घेणार नसल्याचा इशारा श्री. पराडकर यांनी यावेळी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments