विवेक वैद्य ; मालवणात विजयादशमी उत्सव उत्साहात…
मालवण, ता. ०५ : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला समाजातील सुप्त सज्जन शक्तींना एकत्र घेऊन पंच परिवर्तन करायचे आहे. संघ कोणत्याही राजकीय पक्षाचा पुरस्कार करत नाही तर तो फक्त हिंदुत्वाचा पुरस्कर्ता आहे. देशविरोधी शक्तींकडून हिंदू समाजाला तोडण्याचे काम सुरू झाले असून सर्वांनी याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. संघाचे काम हे राष्ट्र यज्ञ आहे आणि प्रत्येक हिंदू बांधवाने यात आपल्या परीने समिधा टाकावी, असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे रत्नागिरी विभागाचे मंत्री विवेक वैद्य यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा श्री विजयादशमी उत्सव आज सायंकाळी कुंभारमाठ येथील हॉटेल जानकी मंगल कार्यालयात साजरा करण्यात आला.
श्री. वैद्य म्हणाले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्य मन, मनगट आणि मेंदूला ऊर्जा देणारे असते आणि याच ऊर्जेच्या जोरावर संघाचा स्वयंसेवक घडतो. अनेकदा बंदी आली तरी स्वयंसेवकांच्या बळावर संघाचा शंभर वर्षांचा प्रवास आजही सुरू आहे. डॉ. केशव हेडगेवार यांनी हिंदू समाजाला गुलामीच्या परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी चिंतन केले. हिंदू समाजाला संघटित केल्यास देश पुन्हा वैभवाकडे जाईल. या मताने त्यांनी संघाच्या शाखेची रचना केली. शाखेतून हिंदू एकता आणि देशप्रेमाचे धडे दिले जाऊ लागले. संघाचा प्रचारक म्हणून कार्य करण्यासाठी उत्तम शिक्षण घेणे आवश्यक आहे असा डॉ. हेडगेवार यांचा आग्रह असायचा.
संघाचा स्वयंसेवक नेहमीच देश कार्यात सहभागी राहिला आहे. गांधी हत्येनंतर आणि आणीबाणीच्या काळात संघावर बंदी आली, मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही संघाने आपले कार्य सुरू ठेवले. या विरोधाची संघाला सवय झाली होती आणि संघ कुठेही थांबला नाही. दरम्यानच्या काळात विश्व हिंदू परिषदेसारख्या अनेक संघटना उदयास आल्या असेही त्यांनी सांगितले.
प्रस्तावना करताना मालवण शाखेचे कार्यवाह रत्नाकर कोळंबकर यांनी शाखेच्या स्थापनेचा इतिहास सांगितला. संघाच्या स्थापनेपासून अनेक प्रचारक मालवणमध्ये आले आणि त्यांनी सिंधुदुर्गात संघाचा प्रचार करण्यासाठी मोठी मेहनत घेतली. गृहस्थी जीवन सांभाळून अनेकांनी संघ कार्यात योगदान दिले. संघावर बंदी आली तेव्हा मालवणमधून अनेकांनी कारावासही भोगला आहे, असे कोळंबकर यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी बापूजी परब यांनी संघाची शिस्त आणि संरचनेचे मोठे कुतूहल असून ते मी स्वतःमध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करत आहे, असे मत व्यक्त केले. राजेश वळंजू यांनी उपस्थितांना संघ मंत्र दिला. घनश्याम मांजरेकर यांनी अमृत वचन तर मंदार सांबारी यांनी ‘जाग उठा है आज देश का बहसों या अभिमान’ हे वैयक्तिक गीत सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विन दिघे यांनी केले.



